माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शिंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त पाच कुटुंबे तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील दहा विद्यार्थिनींच्या शिक्षणाची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा वाळल्या आहेत. पाणी, धान्य व गुरांच्या चाराचे भीषण दुर्भिक्ष्य आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणेही दुरापास्त झाले आहे. टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. ही भीषण परिस्थिती पाहता सुनील शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाच कुटुंबांची त्यांच्याकडे असलेल्या गुरांसह राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली आहे. पाच कुटुंबांची निवास व भोजन तसेच गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले असून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्रही पाठविले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्य़ातील दहा विद्यार्थिनींचे पालनपोषण करण्याची तयारी दर्शविली आहे. माध्यमिक, प्राथमिक, कॉन्व्हेंट, शेतकी शाळा, डी.एड., बी.एड., बीपीएड् महाविद्यालये आहेत. यासर्व ठिकाणी वसतिगृहाचीही सोय आहे. या दहा विद्यार्थिनींचे सशुल्क शिक्षण, स्वतंत्र निवास व भोजन व्यवस्था करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सोलापूरचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र पाठवून दुष्काळामुळे शिक्षण घेण्यास असमर्थ असलेल्या दहा विद्यार्थिनींना पाठविण्याची विनंती केली            आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेत कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही यासंबंधी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. पाऊस पडेपर्यंत ही व्यवस्था शिंदे करणार आहेत.