महिला अत्याचाराच्या प्रत्येक घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यासाठी तक्रारदार, पोलीस आणि समाजाकडून पूर्ण सहकार्य मिळाले पाहिजे; असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबई पोलीस दलात उल्लेखनीय कार्य गाजवणाऱ्या १३ महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
मुबई पोलीस दलातील महिला पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा प्रथमच जाहीर सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. आझाद मदान येथील प्रेरणा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणाची उकल करणाऱ्या कक्ष १०च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपिका जहागीरदार, क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस निरीक्षक सुजाता पाटील, सोनसाखळी चोरांना रंगेहाथ पकडणाऱ्या बीट मार्शल अर्चना मयेकर, सशस्त्र दलाच्या अनुराधा नारायणकर, नऊ महिन्यांच्या अपहृत बालिकेची सुखरूप सुटका करणाऱ्या माटुंगा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भोसले यांचा गौरव झालेल्या पोलीस महिलांमध्ये समावेश आहे. याशिवाय क्रीडा विभागात उल्लेखनीय कार्य करून मुंबई पोलिसांची शान वाढविणऱ्या मंदाकिनी खामकर, आरती नार्वेकर, प्रतीक्षा वसेकर, दीपाली साळुंखे आदींचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या महिला पोलीस या देशात उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला. महिलांबाबतचे प्रत्येक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झालेच पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात आणखी महिला पोलिसांची भरती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंबई पोलिसांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त राकेश मारिया, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.