हिंगोली तालुक्यातील पारडा (भिर्डा) येथे बुधवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत १८ घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या घरातील कापूस व सोयाबीन आगीत खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण कळू शकले नाही. आगीचा प्रकार कळताच महसूल विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत चालू होते.
पारडा (भिर्डा) येथे दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आगीत १८ घरे जळाली. श्यामराव कानबाराव मस्के, रुखमाबाई किसन कदम, भारत मस्के, विनोद मस्के, कानबाराव मस्के, गंगाबाई सखराम मस्के, अवधूत मस्के, बळीराम मारोतराव मस्के, जगदेराव मस्के, विलास इसायी, धाराजी मारोती इसायी, ज्ञानेश्वर नारायण इसायी, शामराव मस्के, चंद्रकांत दिगंबर वाघमारे, चांदु वाघमारे, निवृत्ती वाघमारे, संतोष वाघमारे आदी शेतकऱ्यांची ही घरे असून, यात जनावरांच्या गोठय़ांचा समावेश आहे.
आगीत साहेबराव मस्के, रुक्मिणीबाई कदम यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या घरातील कापूस, सोयाबीन व संसारोपयोगी साहित्यासह अन्न-धान्य जळून खाक झाले. आगीत सुमारे २५ ते ३० लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.