दुष्काळात पशुधन वाचविण्यसााठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त साहाय्यता अभियानांतर्गत सुग्रासदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिली चाऱ्याची गाडी त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सिन्नर येथील जनावरांसाठी खा. समीर भुजबळ यांच्या हस्ते अंजनेरीनजीक वाढोली फाटय़ापासून मार्गस्थ करण्यात आली.
या वेळी आ. जयंत जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, माजी आमदार शिवराम झोले, विष्णुपंत म्हैसधुणे उपस्थित होते. या चळवळीत बागाईतदार शेतकरी, उद्योगपती, व्यापारी यांनी सहभागी होऊन जनावरांना मोफत चारा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केले आहे. दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त साहाय्यक अभियानांतर्गत ‘सुग्रासदान चळवळ’ सुरू करण्यात आली आहे. शासनाने सुरू केलेल्या छावण्यांवर मर्यादा येत असल्याने ज्या ज्या ठिकाणी छावण्यांची गरज आहे, तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. याचा फटका राज्यातील १२५ तालुक्यांना बसला आहे. या तालुक्यातील अनेक गावांत अन्नधान्याचा साठा मुबलक असला तरी जनावरांसाठी चारा नसल्याचे चित्र आहे. पाणी नसल्याने चारा उत्पादन कमी झालेले आहे.