शहर परिसरात सध्या नोकरी, दामदुप्पट पैसा यासह अन्य काही गोष्टींचे प्रलोभन दाखवत फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. नोकरीचे आमिष दाखवत एका बेरोजगार युवकाची साडेतीन लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प येथील आनंदरोड परिसरातील रहिवासी रवींद्र रंगनाथ काळे (४०) दोन वर्षांपासून बेरोजगार आहेत. कॉलेज रोड परिसरातील लायन्स सिक्युरिटी लिमिटेड येथे त्यांनी २०१२ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत रेवनाथ जगताप आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी काही पैशांची मागणी केली. या कालावधीत नोकरीचे कारण दाखवत आपल्याकडून संबंधितांनी तीन लाख ७७ हजार रुपये घेतले. मात्र नोकरी काही दिली नाही. पैशाची मागणी केली असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी जगताप यांच्यासह ४ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of three and a half lakh by showing job