रुग्णांना काही काळासाठी वैद्यकीय साधनांची गरज असते. अनेकांना ही साधने खरेदी करणे शक्य नसते. खरेदी केलेली काही वैद्यकीय साधने वापरानंतर पडून राहतात. हा विचार करून डोंबिवलीतील अशोक शंकर हळबे (वय ६७) या रुग्ण सेवकाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गरज ओळखून रुग्णांना लागणारी विविध सत्तर प्रकारची साधने मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या वैद्यकीय साधनांमध्ये व्हिल चेअर, वॉटर बेड, एअर बेड, फाऊलर बेड, युरिन पॉट ते ऑक्सिजन सििलडपर्यंतची साधने रुग्णांना मोफत देण्यात येतात. कोणतीही वस्तू फुकट दिली तर त्याची किंमत राहात नाही, असे म्हणतात. या साहित्याची कोणत्याही प्रकारे मोडतोड होऊ नये म्हणून जुजबी रक्कम अनामत म्हणून घेतली जाते. वस्तू परत मिळाल्यावर ती रक्कम रुग्णाच्या नातेवाईकाला परत केली जाते, असे हळबे यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून हे काम करण्याची प्रेरणा मिळाली. गेल्या दीड वर्षांपासून हे काम आपण सुरू केले आहे.
डोंबिवलीसह बदलापूर ते ठाणे, मुंबईत आपण वैद्यकीय साधने रुग्णांना देतो. साधने नेण्याची सोय रुग्णाच्या नातेवाईकांनी करायची असते. साधन सुरक्षित रुग्णाच्या घरी पोहचेल तशी सोय उपलब्ध करून देण्यात येते. एक वस्तू तीन महिन्यांपर्यंत एखाद्या रुग्णाच्या घरी ठेवण्याची मुभा देण्यात येते. मुदत वाढून देण्याचीही सोय आहे, असे हळबे यांनी सांगितले.
वस्तू वापरण्याची मुदत संपल्यानंतर अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक समाधानाने ती वस्तू परत आणतात. या वस्तूच्या बदल्यात ठेवलेली अनामत रक्कम रुग्ण नातेवाईक घेण्यास नकार देतात. स्वखुशीने ठेवलेली ही रक्कम संजीवनी वेल्फेअर ट्रस्टमध्ये ठेवतो. अशा काही पैशांची पुंजी तयार झाली की या ट्रस्टच्या माध्यमातून नवीन वैद्यकीय वस्तू खरेदी करण्यात येते. अशा प्रकारे या वस्तूंच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. ट्रस्टच्या कार्याला डॉ. सुनील वानवे, प्रदीप सावंत, मंदार हळबे यांचे सहकार्य मिळते. या सेवेत आपण व्यवहार ठेवत नसल्याने नागरिक समाधानाने वस्तू नेतात व परत आणून देतात, असे अशोक हळबे यांनी सांगितले.
रुग्णालयातही सेवा
अनेक कुटुंबीयांच्या घरात पती, पत्नी दोघेच असतात. मुले बाहेरच्या देशात असतात. दोघांपैकी एखादा तरी आजारी पडून रुग्णालयात दाखल झाला तर दुसऱ्याची मोठी धावपळ होते. त्यामुळे आपणास कोणी विनंती केली तर रुग्णालयात रुग्णाची सोबत करण्यात आपण कमीपणा मानत नाही, असे हळबे यांनी सांगितले.