गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील तहानलेल्या ६९ गावांसाठी नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी (दि. २६) पाणी सोडण्यास प्रारंभ होईल. नाशिक जिल्ह्य़ातील दारणा धरणातून सध्या या बंधाऱ्यात पाणी सोडले असून, उद्या (रविवारी) संध्याकाळपर्यंत बंधाऱ्यात हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी लाभक्षेत्रासाठी पाणी सोडण्यात येईल. दरम्यान, या पाण्यामुळे १५ मेपर्यंत तरी पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.
पाणी सोडण्याबाबत प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यापूर्वीचे आवर्तन १९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान सोडले होते. गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील ६९ गावांसाठी ७५० क्युसेक क्षमतेने हे पाणी सोडले जाणे अपेक्षित असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी सोडल्यानंतर मध्येच ते कोणी उचलू नये वा वीजमोटारी टाकून घेऊ नये, या दृष्टीने दक्ष राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. साडेसातशे क्युसेकने पाणी सोडले गेल्यास ९ दिवस हे आवर्तन सुरू राहील. लाभक्षेत्रात शेवटचा भाग ते मुखाकडील (टेल टू हेड) अशा प्रकारे तलाव भरून घेतले जाणार आहेत.
गुन्हे मागे घेण्याची मागणी
दरम्यान, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यावर जाऊन पाणी सोडण्याचे आंदोलन केल्याप्रकरणी या दोन्ही तालुक्यांतील ८४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारच्या आदेशामुळे पाणी सोडले गेल्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली. ज्ञानेश्वर जगताप, दिनेश परदेशी, प्रमोद जगताप आदींनी ही भेट घेतली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना यात लक्ष घालण्याचा आदेश दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2013 रोजी प्रकाशित
गंगापूर, वैजापूरकरांना १५ मेपर्यंत चिंता नाही
गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील तहानलेल्या ६९ गावांसाठी नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी (दि. २६) पाणी सोडण्यास प्रारंभ होईल. नाशिक जिल्ह्य़ातील दारणा धरणातून सध्या या बंधाऱ्यात पाणी सोडले असून, उद्या (रविवारी) संध्याकाळपर्यंत बंधाऱ्यात हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे.
First published on: 24-03-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangapur baijapur people not to worry upto 15th may