मराठवाडय़ात मागील ५ वर्षांतील पाणीपातळीच्या सरासरीत ७ मीटरने घट झाल्याचे भूजल विकास यंत्रणेच्या जानेवारीच्या अहवालात म्हटले आहे. वाशी (उस्मानाबाद) व कन्नड (औरंगाबाद) या तालुक्यांतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील माण व खटाव या कायमच्या दुष्काळी तालुक्यांपेक्षाही उस्मानाबाद व औरंगाबाद या जिल्हय़ांतील घसरलेली पाणीपातळी चिंताजनक असल्याचे भूजल वैज्ञानिक सांगतात. ज्या निरीक्षण विहिरींच्या आधारे पाणीपातळी मोजली जाते, त्याच आता कोरडय़ा पडल्या आहेत.
औरंगाबाद तालुक्याची मागील पाच वर्षांची जानेवारीतील पाणीपातळी व या वर्षांची सरासरी पाणीपातळी यात ५.७१ मीटरचा फरक आहे. जिल्हय़ातील सर्व तालुक्यांमध्ये पाणीपातळी किमान २.७२, तर कमाल ५.७१ मीटर घट दिसून आली. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हय़ांत घटलेली पाणीपातळी धोक्याची घंटा मानली जाते. मराठवाडय़ातील वाशी तालुक्यात सर्वाधिक उणे ७.०७ मीटर घट दिसून आली. औरंगाबाद जिल्हय़ातील कन्नडमध्ये ही घट ७.०१ मीटर आहे. तुळजापूर, उमरगा, भूम, उस्मानाबाद, कळंब, परंडा, फुलंब्री, औरंगाबाद, वैजापूर येथे पाणीपातळीतील घट ५ मीटरपेक्षा अधिक आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हय़ात पाणीपातळीत घट आहे. तथापि, मराठवाडय़ातील घट राज्याच्या इतर दुष्काळी तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याची नोंद भूजल विकास यंत्रणेकडे आहे. निरीक्षक विहिरींच्या आधारे, तसेच उपग्रहाद्वारे घेतलेल्या चित्रांद्वारे भूगर्भातील पाणीसाठे शोधले जात असून कोठे िवधन विहिरी घ्यायच्या याचे नियोजन केले जाते.
वर्षांनुवर्षे न आटलेल्या विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. बीड जिल्हय़ातील खजाना बावडी प्रथमच आटली आहे. बीड जिल्हय़ातील शिरूर तालुक्यात पाणीपातळीत उणे ४.१८ घट झाली आहे. बीड जिल्हय़ातील सर्व तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याचे आढळून आले आहे.
जालना जिल्हय़ातही पाणीपातळीत घट आहे. मात्र, उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या तुलनेत ही घट कमी आहे. या जिल्हय़ातील  घनसावंगी, भोकरदन व बदनापूर तालुक्यांमध्ये पाणीपातळी साडेतीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे.