परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधत प्रचलित पद्धतीतील दोष टाळणारी पर्यायी शिक्षण पद्धत अनुसरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गुरुकुल शाळांचे संमेलन गेल्या आठवडय़ात बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात पार पडले. बदलापूर येथील योगी श्री. अरविंद गुरुकुल या संस्थेने हे संमेलन भरविले होते. महाराष्ट्रातील ११ तर गोव्यातील एक गुरुकुल शाळा या संमेलनात सहभागी झाली होती. गुरुकुलचे विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच संस्थाचालक अशा तब्बल दीड हजार प्रतिनिधींनी या संमेलनात भाग घेतला. चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने, परस्पर संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा प्रात्यक्षिके असे या संमेलनाचे स्वरूप होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालक तसेच शिक्षकांनाही विविध सत्रात भाग घेऊन विचारांची देवाण-घेवाण केली.
शुक्रवारी सकाळी संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. हावरे बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश हावरे आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. या संमेलनादरम्यान शनिवारी संध्याकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे प्रकाश पाठक, एल अ‍ॅण्ड टी फायनान्सचे संचालक यशवंत देवस्थळी आणि पीतांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांनी या सभेत विचार मांडले. समारोप सत्रात रविवारी गुरुकुल शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे वामनराव ऊर्फ भाऊ अभ्यंकर, गुजरातमधील पुनरुत्थान ट्रस्टच्या संचालिका इंदुमती काटदरे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, आमदार किसन कथोरे उपस्थित होते.
गुरुकुल म्हणजे बारा तासांची शाळा. या शाळेत क्रमिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी चांगला माणूस घडावे म्हणून विशेष उपक्रम राबविले जातात. त्यांना त्यांच्या आवडीनुसार कला तसेच कौशल्ये शिकवली जातात. त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन दिले जाते. मुलांचे सुयोग्य संगोपन आणि शिक्षणाविषयी सजग असणारे अनेक पालक आता अशा शाळांचा पर्याय स्वीकारू लागले आहेत.
संमेलनादरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या गुरुकुल विद्यार्थ्यांनी बदलापूर शहरात शोभायात्रा काढल्या. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. योगी श्री. अरविंद गुरुकुलचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. गुरुकुलांची सध्याची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी असली तरी दोन पिढय़ांनंतर बहुतेक विद्यार्थी त्यांचे शालेय शिक्षण गुरुकुल पद्धतीच्या शाळांमधूनच घेतील, असा आशावाद व्यक्त करतानाच, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्धार सर्व संबंधितांनी यावेळी व्यक्त केला.