बदलत्या निसर्ग चक्रामुळे यंदा शेतकरी हवालदिल झाला असतानाही गावागावांमध्ये सामुहिकरित्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे, याविषयी मतभिन्नता आढळून येत आहे. त्यातच ग्रामीण भागावर असलेल्या धार्मिकतेचा पगडा अशा अवस्थेतही कायम असून अनेक गावांमध्ये मंदीर बांधण्यासाठी निधी जमा करण्याची धडपड सुरू आहे. काही जणांनी मात्र यंदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि कोणतेही पीक हाती न आल्याने मंदिरासाठी निधी जमविण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करणे अधिक गरजेचे असल्याची भूमिका मांडली आहे.
यंदा सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. निफाड, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांमध्ये द्राक्षबागा आडव्या झाल्या. तर, सटाणा, कळवण, मालेगाव या तालुक्यांमध्ये डाळिंब, बाजरी, कांदा पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली. हाती येणारे पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. त्यातच ज्यांच्या घरी लग्नकार्य होणार होते, त्यांनाही पैशांअभावी नियोजित कार्य पुढे ढकलण्याची वेळ आली. परंतु ज्यांना ते शक्य झाले नाही, त्यांना त्यासाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एकिकडे शेतकरी बिकट आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना दुसरीकडे काही गावांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे मंदिर बांधण्यासाठी काही जण पुढाकार घेताना दिसून येत आहेत. त्यासाठी गावातील प्रत्येकाकडून काही प्रमाणात निधी जमा करण्यात येत असून काही गावातील ग्रामस्थांनी नाशिकमध्ये अलीकडेच त्यासाठी फेरीही काढली.
मंदिर बांधण्यास कोणाचाच विरोध नसला तरी सध्या ज्या परिस्थितीत मंदिरासाठी निधी जमा करण्यात येत आहे, ते योग्य नसल्याचे मत काही जणांकडून मांडण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना मंदिरापेक्षा बिकट अवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे अधिक आवश्यक असल्याचे सांगितले. एखाद्या गावातील ग्रामस्थ आपल्याच गावातील गरीब शेतकऱ्याच्या मदतीसाठी अशा प्रकारचा निधी जमवून सामुहिक प्रयत्न करत असल्यास तो सर्वासाठी आदर्श ठरू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्यांच्याकडे दानधर्म करण्यासाठी पैसाच नाही. त्यामुळे मंदिर उभारणीसाठी निधी जमा करण्याकरिता ही योग्य वेळ नाही. मंदिर उभारणीसाठी येणारा खर्च कित्येक लाखांच्या घरात असतो. सध्याच्या परिस्थितीत एवढी रक्कम उभी करणे हेच मोठे आव्हान आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून त्यास पाठिंबा मिळणेही शक्य नाही, असेही पाटील यांनी नमूद केले आहे. याउलट गावाने एकत्र येऊन टंचाईच्या काळात नियोजनासाठी बंधारा किंवा तलाव बांधण्याचा उपक्रम आखल्यास त्यासाठी सर्व ग्रामस्थ नक्कीच एकत्र येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
मंदिर उभारणीपेक्षा शेतकऱ्यांना मदत आवश्यक
बदलत्या निसर्ग चक्रामुळे यंदा शेतकरी हवालदिल झाला असतानाही गावागावांमध्ये सामुहिकरित्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे,
First published on: 24-04-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help farmers before building temple