विजेचे प्रामाणिक बिल भरणारे ग्राहक म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील ग्राहकांकडून अधिक वीज बिल वसूल करण्याचा महावितरण कंपनीने जणुकाही विडाच उचलला असून ऐरोलीनंतर आता नेरुळ-सानपाडा येथे वाढीव वीज बिलांचा धक्का देण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याला दोन अडीच हजार रुपये बिल येणाऱ्या ग्राहकांना आता अचानक पंधरा हजार रुपये बिल येऊ लागल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
राज्यात विद्युत वीज बिल वसुलीमध्ये वाशी परिमंडळाचा पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे प्रामाणिक ग्राहक, अशी नवी मुंबईकरांची ओळख आहे. भिवंडीसारख्या शहरात दररोज लाखो रुपयांची वीज चोरी होत असताना नवी मुंबईत वीज चोरीच्या घटना नाहीत. अठरापगड जातीचा येथील ग्राहक वीज बिल भरण्यास आघाडीवर आहे. असे असताना याच ग्राहकांना जास्त त्रास देण्याची महावितरण कंपनीची भूमिका असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. ऐरोली येथील ग्राहकांना गतवर्षी अशाच प्रकारे भरमसाट बिले देण्यात आली होती. त्या संदर्भात आमदार संदीप नाईक यांनी वितरण कंपनीच्या ग्राहकांना जाब विचारला होता. काही दिवसांपूर्वी ऐरोली सेक्टर-३ मधील ग्राहकांनी उत्स्फूर्त ऐरोली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. महावितरण कंपनीने अलीकडे काही ग्राहकांचे मीटर बदलले आहेत. तेव्हापासून या ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागली आहेत.
सानपाडा येथे राहणाऱ्या संतोष नाईक यांनाही काही दिवसांपूर्वी १४ हजार रुपयांचे बिल आल्याने धक्काच बसला. सरासरी दोन हजार रुपये बिल येणाऱ्या नाईक कुटुंबीयांच्या घरी १४ हजाराचे विद्युत बिल आल्याने त्यांनी थेट महावितरणाचे कार्यालय गाठले पण त्या ठिकाणी अगोदर संपूर्ण बिल भरा. नंतर तक्रारीची दखल घेतली जाईल, अशी उद्दाम उत्तरे दिली गेली आहेत. ज्यांचा पगारच दहा हजार रुपये आहे ते १४ ते १५ हजार रुपयांचे बिल कसे भरणार, या प्रश्नांचे उत्तर मात्र वितरण कंपनीचे अधिकारी देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यास कंपनीने सुरू केले असल्याचे दिसून येते. बिल बनविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. या एजन्सीचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी किंवा मीटर बॉक्सपर्यंत न जाता अंदाजे बिल आकारणी करीत असल्याचे समजते. महावितरण कंपनीने योग्य बिल आकारणी न केल्यास बिल न भरण्याचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.