मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नाचा सर्वसमावेशक विचार करून तोडगा सुचविणारी योजना मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. यात तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईतील वाहतुकीचे नियोजन व व्यवस्थापन करण्याचा विचार असून या प्रकारची हायटेक योजना प्रथमच पालिका राबविणार आहे.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) २००८ साली तयार केलेल्या ‘कॉम्प्रिहेन्सीव्ह ट्रान्सपोर्टेशन स्टडी’वर (सीटीएस) ही योजना आधारलेली आहे. सध्याच्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजन करणारी सॉफ्टवेअर आम्ही तयार करत आहोत, असे पालिकेतील रस्ते, वाहतूक व पुल विभागाचे प्रमुख एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी सांगितले. हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसह (एमयूटीपी) जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवला जाणार आहे.
श्रीनिवासन यांनी या आधी एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी त्यांनी सीटीएस योजनेवर काम केले होते. त्यावेळच्या अनुभवाच्या मदतीने शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी बसविण्याचा त्यांचा विचार आहे. वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी जितका खर्च होतो त्याच खर्चात ही नवी योजना कार्यरत होऊ शकते, असे त्यांचे मत आहे.
येत्या पाच वर्षांमधील वाहतुकीचे व्यवस्थापन कसे करायचे याचा विचार या योजनेत असेल. त्यात पार्किंगची गरज, रस्त्यांची लांबी-रुंदी, रस्ते आणि पूल यांचा विचार होणार आहे. यासाठी दर वर्षी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वप्रथम दळणवळण आराखडा बनवण्यात येणार आहे. या आराखडय़ात रहिवासी आणि नोकरदार यांच्या प्रवासाची पद्धत आणि वाहतूक वाहती राहण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार होईल. तसेच वाहतूक प्रणालीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरनुसार शहरातील रस्त्यांचे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व आणि ते रस्ते विस्तारण्यासाठी आवश्यक गोष्टी यांचा अभ्यास करता येईल. सध्या या गोष्टीसाठी महापालिका फक्त सीसीटीव्ही कॅमेरातून केल्या जाणाऱ्या चित्रीकरणावर अवलंबून आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या मोजण्यासाठी सर्वच रस्त्यांवरील वाहतुकीची घनता मोजण्यात येणार आहे. शहरात पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, लाल बहादुर शास्त्री मार्ग असे प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यांचा विकास करावा लागेल का, याचा विचारही या प्रकल्पात होणार आहे, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
या प्रकल्पात पादचाऱ्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचाही विचार होणार आहे. याआधी एकदिशा किंवा दोन्ही दिशा मार्ग हे कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय ठरवले जात होते. मात्र आता याबाबतचा निर्णय घेताना व्यवस्थित अभ्यास आणि संशोधन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
वाहतूक समस्येवर‘हायटेक’ तोडगा!
मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नाचा सर्वसमावेशक विचार करून तोडगा सुचविणारी योजना मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे.

First published on: 26-09-2013 at 06:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hightake solution on transportation problem