मराठी माणूस, मराठी भाषा आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट  घडविण्याचे ध्येय जाहीर करत स्थापन झालेली मनसे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. मराठी पाटय़ांच्या आंदोलनात खळ्ळ खटय़ॅक करून मनसेचा धाक उभा राहिला तरी पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या मात्र हे गावीही नसावे. यामुळेच लाखो रुपये खर्चून त्यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या  होर्डिग्जवर ‘विश्वासपात्र उमेदवार’ असे मराठीत न लिहिता इंग्रजीला प्राधान्य देत ‘बिलिव्ह मी’ वाक्य झळकत आहे.
शिवसेनेचा मराठीचा मुद्दा चोरणारे आणि खळ्ळ खटय़ॅक करून मराठीत पाटय़ा लावायला लावणाऱ्या मनसेच्याच उमेदवाराने लोकसभा निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये इंग्रजीचा आसारा घेतल्यानंतर आता जनताच मतदानातून ‘खळ्ळ खटय़ॅक’ करून दाखवेल अशी ‘मार्मिक’ प्रतिक्रिया सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आदित्य शिरोडकर यांच्यामागे धनशक्ती उदंड असल्यामुळे जाहिरात फलक, उमेदवाराचे आवाहन पत्रक अथवा उमेदवाराचा विकासाचा प्राधान्यक्रम आदींची पत्रके तयार करण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले नाही. खासगी जाहिरात कं पन्यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असल्याचे मनसेच्याच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दादर-माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला हस्तगत करताना आमदार तसेच सातही नगरसेवक निवडून येण्याचा चमत्कार झाला असला तरी आदित्य शिरोडकरांच्या प्रचारात नगरसेवक व आमदारांचा म्हणावा तसा सहभाग दिसत नसल्याचे मनसेच्याच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यातूनच नायगाव येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी मैदानातील खुच्र्या रिकाम्या राहिल्या. दुकानदारांनी मराठीमध्ये पाटय़ा लावाव्या यासाठी मनसेने आंदोलन केले. दुकाने फोडण्यात आली. आता राज ठाकरे राहात असलेल्या दक्षिणमध्य मुंबईतील मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर यांनी आपल्या जाहिरातीत इंग्रजीचा आश्रय घेत असतानाही राज ठाकरे गप्प का, असा सवाल शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. लोकांनी विश्वास ठेवावा यासाठी इंग्रजीचा आश्रय घेत ‘बिलिव्ह मी’ म्हणणाऱ्यावर विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल दादर-माहिममध्येच केला जात आहे.