‘सर्वसामान्यांना परवडणारी घरे’ तयार करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा)घरांच्या किमतीही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. ‘म्हाडा’तर्फे तुंगा व्हिलेज येथे बांधण्यात आलेल्या आणि पुढील वर्षी सोडत निघणाऱ्या घरांची किंमत एक कोटीपर्यंत जाणार आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या घरांच्या किमतीची बरोबरी ‘म्हाडा’च्या घरांनी आता केली आहे.
ज्यांचे मासिक उत्पन्न ४० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा उच्च उत्पन्न गटासाठी ‘म्हाडा’तर्फे तुंगा व्हिलेज येथे अडीचशे सदनिका बांधण्यात येणार आहेत. ज्या संकुलात ही २५० घरे बांधण्यात येत आहेत, त्याच ठिकाणी असलेल्या उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी ‘म्हाडा’ने बांधलेल्या ४८० सदनिका ७५ लाख २२ हजार रुपयांना तर मध्य उत्पन्न गटासाठी बांधलेल्या २५२ सदनिका ४८ लाख ९ हजार रुपयांना मे महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीत विकल्या गेल्या होत्या.
उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी २५० सदनिका ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत, तेथे ‘म्हाडा’कडून बृहन्मुंबई महापालिकेसाठी प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येणार असून नंतर ते पालिकेला हस्तांतरित केले जाणार आहे. तसेच काही ठिकाणी आम्हाला जमिनीखालील खडक मोठय़ा प्रमाणात फोडून काढावा लागला. या खर्चामुळे २०१४ च्या सोडतीत या घरांची किंमत एक कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी निरंजनकुमार सुधांशु यांनी दिली.
तसेच मे महिन्यातील सोडतीत ज्या सदनिका विकल्या गेल्या त्यांचे क्षेत्रफळ ४७६.७४ चौरस फूट होते तर आता ज्या सदनिकांचे बांधकाम सुरू आहे, त्याचे क्षेत्रफळ ७४० चौरस फूट आहे. तीन इमारतींमध्ये या २५० सदनिका आहेत. राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग आणि तटरक्षक दलाकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी या सदनिका मिळाव्यात, असा प्रस्ताव ‘म्हाडा’कडे आला आहे. आम्ही त्यावरही विचार करत आहोत, मात्र याचा अंतिम निर्णय ‘म्हाडा’च्या बैठकीत घेण्यात येईल, असेही सुधांशु यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘म्हाडा’च्या घराचीही ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’!
‘सर्वसामान्यांना परवडणारी घरे’ तयार करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा)घरांच्या किमतीही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.

First published on: 13-09-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a first cost of mhada flats to touch rs 1 crore