सध्या लग्गसराई जोरात सुरू असून या लग्नाच्या समारंभातील महत्त्वपूर्ण व लग्नापेक्षाही अधिक खर्चाच्या ठरू पाहणाऱ्या हळदी समारंभात गावोगावी डीजेच्या कर्कश तालावर थिरकत तरुणाई लाखो लिटर दारूवर व शेकडो किलो मटण-चिकनवर येथेच्च ताव मारीत आहे. त्यामुळे याच हळदी समारंभाच्या कालावधीत तारुण्यात पदापर्ण करणाऱ्या तरुणांच्या व्यसनाधीतेची सुरुवात तसेच वाढही होऊ लागल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
एप्रिल-मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात लग्नांचा हंगाम असतो. या हंगामात लग्नाच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे हळदीच्या दिवसालाच सध्या अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. लग्नाच्या खर्चात वाढ होत असताना लग्नासाठी उभारण्यात येणाऱ्या आलिशान शामियान्यांसोबतच तरुणाईची आई-वडिलांकडे महागडय़ा डीजेची मागणी असते.
डीजेच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डीजेच्या आवाजावर नियंत्रण असावे अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना सित नाही. तर एखाद्याने या संदर्भात तक्रार करायची म्हटली तर आमच्या आनंदात विघ्न का आणता, असा सूर आवळीत तक्रारदारालाचा गप्प करण्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नियम डावलून डीजे लावले जात आहेत.
लग्नातील दोन दिवसांच्या समारंभ एका दिवसावर आणून समाजातील लग्नावरील वाढत्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न अनेक गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच काही तरुणही करू पाहत आहेत. मात्र त्यांना यश येताना दिसत नाही. या वाढत्या दारू-मटणाच्या हळदींमुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असल्याने हळदीचा खरा अर्थ तरुणाईला समजावण्यासाठी तरुणांनीच पुढे येण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing liquor consumption in marriage celebration