सखी मंद झाल्या तारका, दिसलीस तू फुलले ऋतू, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सांज ये गोकुळी, दयाघना. अशा कितीतरी भावगीतांना सुरेल स्वरसाज चढवून घराघरांत पोहोचलेल्या सुधीर मोघे यांनी गीत कसे सुचते, कविता कशा सुचतात?, आपल्या अवतीभोवती घरातील माणसांच्या सहवासातून, अनुभवातून शब्द कसे साकारतात? आदी कुतूहलमिश्रित प्रश्नांची उत्तरे देताना आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातले पैलू व जीवनप्रवासातले अंतरंग उलगडले.
लातूरकर रसिकांशी हितगूज साधण्याची ही संधी पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेने दिली. या मालेतील तिसरे पुष्प गीतकार सुधीर मोघे यांनी ‘कवितेचे हितगूज’ या विषयावर गुंफले. चार कवितासंग्रह, गद्यलेखनाची चार पुस्तके, जवळपास ६० मराठी चित्रपटांत लोकप्रिय गीतांना शब्दबद्ध करणारे हेच का ते सुधीर मोघे? असा प्रश्न पडावा इतक्या विनम्रपणे ओघवत्या शैलीत लातूरकरांचे मन त्यांनी जिंकले. मला संगीतकार, दिग्दर्शक, नाटककार व्हावे असे नेहमी वाटे. पण ‘दाटला काळोख होता चहू दिशेला, नीरव श्वास होता वेदनांना’ ही पहिली कविता त्यांनी सादर केली व तेथूनच काव्यरचनेला सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.
राम पाठक यांनी आपल्यावर जिवापाड प्रेम केले असे सांगून ‘सखी मंद झाल्या तारका’ या विषयातील पहिले भावगीत उदयास आले. ‘राजा शिवछत्रपती’ या चित्रपटात लातूरच्या श्रीराम गोजमगुंडे यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका केली. या चित्रपटात मदारी मेहतरची छोटीशी भूमिका आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले. बसवंत भरडे यांनी प्रास्ताविक, तर सुमुख गोिवदपूरकर व आदित्य कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील बोकील, अतुल ठोंबरे, अॅड. ऋचा ठोंबरे, डॉ. बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘हितगूज’मधून उलगडले गीतकार मोघे यांचे अंतरंग
शारदोत्सव व्याख्यान मालेतील तिसरे पुष्प गीतकार सुधीर मोघे यांनी ‘कवितेचे हितगूज’ या विषयावर गुंफले. ६० मराठी चित्रपटांत लोकप्रिय गीतांना शब्दबद्ध करणारे हेच का ते सुधीर मोघे? असा प्रश्न पडावा इतक्या विनम्रपणे ओघवत्या शैलीत लातूरकरांचे मन त्यांनी जिंकले.

First published on: 18-10-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaviteche hitguj in shardotsav speech from sudhir moghe