लंडन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई अशा जगभरातील प्रेमिकांच्या हाती यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला पंचगंगाकाठी फुललेला गुलाब असणार आहे. यासाठी श्रीवर्धन बायोटेकमधून यंदा पाच लाख मोहोक, सुगंधी गुलाब निर्यात होऊ लागला असून व्हॅलेनटाईन डेच्या पूर्वसंध्येला तेथील देशात तो पोहोचणार आहे. त्याचवेळी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक मोठय़ा शहरात सुमारे ३ लाख गुलाबाची फुले मार्गस्थ होऊ लागली आहेत.
प्रेमाचा दिवस म्हणून जगभर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. नानाविध स्वरूपाच्या भेटी एकमेकांना दिल्या जातात, पण प्रेमिकांच्यादृष्टीने विशेष महत्त्व असते ते गुलाबाच्या फुलाला. लाल, गुलाबी, पिवळा अशा विविध रंगांचे गुलाब देऊन प्रेमाविषयीची वेगवेगळी परिभाषा व्यक्त केली जाते. लाल फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग जगभर रूढ झाला आहे. म्हणूनच व्हॅलेंटाईन डे साठी सर्वाधिक मागणी असते ती लाल रंगाच्या आकर्षक गुलाबाला. हे लक्षात घेऊनच शिरोळ तालुक्यातील कोडिंग्रे यागावी श्रीवर्धन बायोटेकच्यावतीने हरितगृहात गुलाबाची शेती केली जाते.
१९९८ साली चार एकरात सुरू झालेला श्रीवर्धनचा हरितगृहाचा विस्तार आता १०३ एकरापर्यंत पसरला आहे. त्यातील बहुतांश जागेत विविधरंगी गुलाब फुलांची शेती केली जाते. आमदार सा.रे.पाटील यांनी रोवलेली ही शेती आता त्यांचे पुत्र उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी जोमाने फुलविली आहे. त्यासाठी त्यांना जामात रमेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
यंदाच्या व्हॅलेंटाईन डे साठी गतवर्षी पेक्षा मागणीमध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. ग्रीस व ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी दीड लाख, जपान व दुबईला प्रत्येकी ५० हजार, लंडनला १ लाख गुलाबाची फुले निर्यात केली जाणार आहेत. निर्यात होणारे गुलाबाचे फूल ४० सेमी ते ७० सेमी लांबीचे असावे लागते.
ग्रँड गाला, अप्पर क्लास, सामुराई, फस्ट रेड, बिग बी या जातीच्या लाल गुलाबांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मागणीनुसार पुरवठा करण्याचे काम फेब्रुवारी उजाडल्यापासून सुरू झाले आहे. ९ तारखेपर्यंत शिपमेंटचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर देशांतर्गत मागणीच्या पुरवठय़ाकडे लक्ष दिले जाणार आहे. मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई अशा बडय़ा शहरात श्रीवर्धनमध्ये उमललेले गुलाब पुष्प पोहोचणार आहे. त्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख गुलाबाची फुले तयार आहेत, असे गणपतराव पाटील यांनी सांगितले.
हरितगृहाची शेती यशस्वी होत नाही असे म्हणणा-यांची तोंडे श्रीवर्धन बायोटेकमध्ये पाय ठेवल्यानंतर आपोआपच बंद होतात. येथे गुलाबाच्या बरोबर जरबेरा, कारनेषण, रंगीत ढब्बू मिरची, शेवंती, ऑरकिड, तसेच परदेशी भाजीपाला अशी विविध प्रकारची पिके घेतली जातात. १०३ एकराच्या या प्रकल्पामध्ये सर्वाधिक फूल शेती मातीविना केली जाते, हे या हरितगृहाचे वैशिष्टय़ होय. येथून दरमहा सुमारे ५ लाख गुलाब फुले निर्यात होतात. तर तीन ते चार लाख गुलाब फुले देशभरात विक्रीसाठी जातात. हरितगृहाचा यशस्वी प्रयोग राबविल्याबद्दल श्रीवर्धन बायोटेकचा ‘भारतातील सर्वाधिक फूल उत्पादक’ व ‘भारतातील सर्वाधिक फूल निर्यात’ बद्दलचे पुरस्कार मिळाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
पंचगंगाकाठी फुललेला गुलाब परदेशी युगुलांच्या मदतीला
लंडन, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई अशा जगभरातील प्रेमिकांच्या हाती यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला पंचगंगाकाठी फुललेला गुलाब असणार आहे. यासाठी श्रीवर्धन बायोटेकमधून यंदा पाच लाख मोहोक, सुगंधी गुलाब निर्यात होऊ लागला असून व्हॅलेनटाईन डेच्या पूर्वसंध्येला तेथील देशात तो पोहोचणार आहे.
First published on: 08-02-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapurs aromatic roses will export around the world for valentines day