लातूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या बठकीत शुक्रवारी सोडण्यात आला. त्याचा कृतिआराखडा राबवण्यास सुरुवातही करण्यात आली.
महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर स्मिता खानापुरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, अॅड. त्र्यंबकदास झंवर, ग्रीन फाऊंडेशनचे शिरीष कुलकर्णी, शिरीष पोफळे यांच्या उपस्थितीत हॉटेल अरोमा येथे सकाळी आयोजित बठकीत हा संकल्प सोडला. दि. ८ सप्टेंबपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रभाग या ठिकाणी प्लॅस्टिकमुक्तीबाबत जागरण केले जाईल. ८ सप्टेंबरला शहरात नागरिकांची फेरी निघेल. यात प्रत्येकाने आपल्या घरातील प्लॅस्टिक आणावे. दि. ९ ते १७ सप्टेंबरदरम्यान प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दि. १७ सप्टेंबरला शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी निघेल. १८ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्लॅस्टिक कायमचे विसर्जन करण्यात येईल, असा कृतिआराखडा बठकीत आयुक्त तेलंग यांनी सादर केला.
औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दापोली व औसा येथे प्लॅस्टिकमुक्ती करून दाखवली. प्लॅस्टिकमुक्तीसाठी आधी सौजन्याचा मार्ग अवलंबावा. गरज भासेल तेव्हा सक्ती करावी, असे मत मांडले. प्लॅस्टिक वापरामुळे न भरून येणारी हानी होते. जमिनीवर प्लॅस्टिक कुजण्यास १ हजार वष्रे, तर पाण्यात कुजण्यास ४०० वष्रे लागतात. तोपर्यंत प्लॅस्टिक अनेकांचे जीवन कुजवतो हे लोकांना समजावून सांगितले पाहिजे. आपण घरात पादत्राणे नेत नाही, त्या धर्तीवर कॅरीबॅगही नेऊ नका. प्लॅस्टिकमुक्त अभियानात ‘तुम्ही मला पिशवी द्या, मी तुम्हाला स्वच्छता देतो’ अशी ग्वाही लोकांना दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
मानिनी महिला मंडळाच्या सीमा अयाचित यांनी अभियानात लागणाऱ्या कापडी पिशव्या महिला बचतगटामार्फत शिऊन देण्याचे आश्वासन दिले. एका साडीत १८ मोठय़ा व छोटय़ा ४२ पिशव्या तयार होतात. आहेरी साडय़ांचा वापर यासाठी करता येतो, असे त्यांनी सांगितले. मी हुंडा घेणार नाही व हुंडा घेऊ देणार नाही, या धर्तीवर मी कॅरीबॅग वापरणार नाही व वापरू देणार नाही, असा संकल्प करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापारी संघटनेचे सचिव दिनेश गिल्डा यांनी लातुरातील व्यापारी दुकानातून ग्राहकांना प्लॅस्टिकची पिशवी देणार नसल्याचे जाहीर केले. रोटरी क्लब सिटीतर्फे पुरुषोत्तम देशमुख यांनी शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रचारासाठी विविध ठिकाणी १० हजार स्टीकर लावणार असल्याचे सांगितले. जनकल्याण विद्यालयाचे कार्यवाह शिवदास मिटकरी यांनी भाजी मंडईतील वाया जाणारी भाजी, फळे याची वाहतूक स्वत: करून त्यापासून बायोगॅस निर्मिती करणार असल्याचे सांगितले. भाजी विक्रेता संघटनेचे सचिव रवींद्र तारे यांनी भाजी मंडईत कॅरीबॅग कोणीही वापरणार नसल्याचे आश्वासन दिले. जनाधार संस्थेचे संजय कांबळे, राममनोहर लोहिया विचार मंचचे बालाप्रसाद किसवे, शिवाई संस्थेच्या उषा भोसले, मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. राजकुमार सोनवणे, प्रा. सुभाष िभगे, शिक्षक सेनेचे मंगेश सुवर्णकार, वनश्रीचे अर्जुन कामदार आदींनी मनोगत व्यक्त केले. दयानंद, शाहू, सुशीलादेवी, बसवेश्वर आदी महाविद्यालयांतील एनएसएस व एनसीसी विभागांच्या वतीने अभियानात सक्रिय सहभाग देण्याचे घोषित केले.
गाईच्या पोटात निघते
साठ किलो प्लॅस्टिक!
प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून शिळे अन्न फेकण्याची सवय सर्वत्र सर्रास असते, मात्र त्याचे वाढते व गंभीर दुष्परिणाम मोकाट जनावरांवर होत आहेत. त्यांच्या पोटात प्लॅस्टिकचा लगदा तयार होतो. पूर्वी १० किलो, २० किलो ते ४० किलोपर्यंतचा लगदा शस्त्रक्रियेनंतर निघत होता. आता ६० किलोपर्यंतचा लगदा जनावरांच्या पोटातून निघत असल्याचे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एस. पवार यांनी निदर्शनास आणले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2013 रोजी प्रकाशित
प्लॅस्टिकमुक्तीसाठी लातूरकर सरसावले
लातूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या बठकीत शुक्रवारी सोडण्यात आला. त्याचा कृतिआराखडा राबवण्यास सुरुवातही करण्यात आली.
First published on: 31-08-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur people trying for plastic free city