माणूस मूळचा आंध्रप्रदेशचा. शिक्षण झाले अहमदाबादमध्ये. राहतो मुंबईत आणि सामाजिक कामे सुरू आहेत ती नागपूरमध्ये. अप्रूपच. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी पिळवटून टाकलेल्या एस.एस. गंगाराजू यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश आहे. त्यांनी १५ विद्यार्थ्यांना लघुशोधनिबंधासाठी हजारो रुपयांची आर्थिक मदत केली.
 गंगाराजू मुंबईतील एका प्रतिष्ठाणात विपणन आणि संशोधन विभागाचे व्यवस्थापक आहेत. ते कंपनीच्या कामानिमित्त तीन-चार दिवसांसाठी नागपुरात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यांच्यासाठी भरीव काहीतरी करावे, असे त्यांना सारखे वाटे. त्यासाठी त्यांनी अकोला आणि नागपुरातील कृषी महाविद्यालयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नागपुरातील कृषी महाविद्यालयासमोरून जात असताना यांनी विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याची मनीषा तेथील अधिष्ठाता डॉ. व्ही.एस. गोंगे यांच्याकडे व्यक्त केली. महाविद्यालयाने काही प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले. त्यापैकी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव त्यांना पटला.
गंगाराजू यांनी आजीच्या नावाने ‘सरस्वती अम्मा शिष्यवृत्ती’ तर मुलीच्या नावाने ‘अनन्या शिष्यवृत्ती’ पुढील पाच वर्षांसाठी सुरू करण्याचे ठरवले. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा लघुशोधनिबंधासाठी बराच खर्च होतो.
त्यांनी ताबडतोब तीन विद्यार्थिंनी आणि दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली. रितू चौधरी, एल.जी. योमगुम, पी.पी. शहाणे, आर. अजमेरा आणि एस.ए. सपकाळ या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती स्वीकारली.
‘अनन्या शिष्यवृत्ती’ प्लान्ट पॅथलॉजी, अ‍ॅग्रीकल्चर इकॉनॉमिक्स, अ‍ॅग्रीकल्चर केमिस्ट्री आणि सॉईल सायन्सेस या विद्याशाखांमधील विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्यांवर काम करणाऱ्या एका विद्यार्थ्यांला देण्याचे ठरले होते. मात्र, प्रस्ताव ठेवताच एकदम दहा विद्यार्थ्यांचे अर्ज आले. शिवाय विद्यार्थ्यांनी प्राथमिक नमूने गोळा केले होते.
केवळ विश्लेषण करणे बाकी होते. गंगाराजू यांनी त्या दहाही विद्यार्थ्यांना प्रत्येकी २,५०० रुपये देऊ केले. येत्या १० मे रोजी त्या दहापैकी एका विद्यार्थ्यांची निवड करून खऱ्या अर्थाने २५ हजार रुपयांची अनन्या शिष्यवृत्ती देण्याची कबुली त्यांनी दिली आहे.

एस.एस. गंगाराजू म्हणाले, गुजरातमधील एसएमसी महाविद्यालयाने मला शिक्षण देऊन सक्षम केले आहे. त्या महाविद्यालयाला चांगले अनुदान मिळते आणि विदर्भातील शेतकऱ्यांना असलेल्या समस्या येथील शेतकऱ्यांना नाहीत. शेतकऱ्यांमुळे आपल्याला अन्न मिळते. त्यांनी आत्महत्या करून जीवन संपवावे, एवढी अगतिकता कुणावरही यायला नको. म्हणून पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर शिक्षणाच्या माध्यमातून काही प्रकाश टाकता येईल का, या हेतूने शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा विचार डोक्यात आला.