चार महिन्यानेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून स्वत:च्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याचे आव्हान प्रमुख पक्षांच्या विद्यमान आमदारांवर येऊन पडले आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चार महिन्यांनी अपेक्षित आहे. त्याची आठवण ठेवून विद्यमान आमदार मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसून येते. वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीयांचा बोलबाला आहे. वर्धा- आमदार प्रा.सुरेश देशमुख (अपक्ष), देवळी- राज्यमंत्री रणजित कांबळे (कॉंग्रेस), धामणगाव- प्रा.वीरेंद्र जगताप (कॉंग्रेस), मोर्शी- डॉ.अनिल बोंडे (अपक्ष), आर्वी- दादाराव केचे (भाजप) व हिंगणघाट- अशोक शिंदे (शिवसेना) अशा या सहाही आमदारांपैकी काहींनी लोकसभा निवडणूक मनावर घेतल्याचे दिसून येते.
मोर्शीचे डॉ.अनिल बोंडे अपक्ष असून त्यांनी भाजपचे रामदास तडसांना पाठिंबा घोषित केला. मात्र, प्रचारात त्यांनी सध्या राखलेले मौन गुढच ठरले आहे. याच मतदारसंघाचे कॉंग्रेसचे दावेदार नरेश ठाकरे व राकांॅचे हर्षवर्धन देशमुख यांनी मात्र कांॅग्रेसच्या सागर मेघेंना भरभरून साथ देण्याचे ठरविल्याचे दिसून येते. पक्षांतर्गत निवडणुकीत सर्वाधिक मते सागर मेघेंना मिळण्यात ठाकरेच कारणीभूत ठरल्याचा ताजा इतिहास आहे.
धामणगावचे कांॅग्रेसचे आमदार जगताप यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत मेघेंना कट्टर विरोध करीत चारूलता टोकसांना मदत दिली. राव गटाचे जगताप मेघेंना कितपत साथ देणार, हे पुढेच ठरेल. कारण, त्यांच्या तिकिटाची शिफोरस हा कळीचा मुद्या मानला जातो. या भागात माजी आमदार अरुण अडसड तडसांची प्रचारधुरा सांभाळत असून या क्षेत्रात सर्वाधिक मताधिक्य महायुतीला मिळवून देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
वध्र्यात अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रा.सुरेश देशमुख यांनी राकॉंचे सहयोगी सदस्यत्व मिळवत पवारनिष्ठा जपली. या मतदारसंघात मेघे व तडस या दोघांनाही जोर लावावा लागत आहे. देशमुखांना मेघेंकडून तिकिटाची अपेक्षा नाहीच. कारण, मेघेंकडे संभाव्य उमेदवारांची रांगच आहे. देशमुखांकडून वध्र्याखेरीज जिल्हाभर असणारी सहकार गटाची मते मेघेंना अपेक्षित आहेत. गतवेळी कॉंग्रेसच्या शेखर शेंडेंना पराभूत करणारे देशमुख मेघेंच्या कोणत्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रचारात आहे, हे गुपित आहे.
आर्वीत भाजपचे दादाराव केचेंना मतदारसंघात भाजपचे मताधिक्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. या ठिकाणी मेघेंसाठी भय्यासाहेब काळे व अमर काळे हे कट्टर विरोधक एकत्र आले असले तरी त्यांची बेरीज कापण्याचा विडा के चेंनी उचलला आहे. तडसांसाठी नव्हे, तर पुढील विधानसभा निवडणुकीसाठी गढ अभेद्य राखण्याची केचेंची तयारी सुरू आहे.
देवळीत राज्यमंत्री रणजित कांबळे हे निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी ओळखले जातात. गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपतर्फे उभे रामदास तडस यांचा अशक्य असा पराभव केला होता. कांबळेंना तिकिटाची खात्री आहे. दुसऱ्यासाठी मते खेचण्यापेक्षा स्वत:साठी मते मिळवण्यात तरबेज कांबळे हे मेघेंची उमेदवारी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कितपत गांभिर्याने घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कारण, महायुतीचे तडस यांचाही देवळी बालेकिल्ला आहे. तडसांनी लोकसभेत जावे की, विधानसभेसाठी सज्ज व्हावे, याचा निकाल हाच मतदारसंघ ठरवेल.
हिंगणघाट सर्वात बेभरवशाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. नेहमी कांॅग्रेसविरोधाची मानसिकता जपणाऱ्या या मतदारसंघात विद्यमान आमदार अशोक शिंदेंची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजप नेते मित्र नव्हे, तर पाहुणे म्हणून आम्हाला वागवतात, असा आरोप यापूर्वीच सेनेकडून झाला आहे. कारण, गतवेळी मेघेंना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळूनही विधानसभेवेळी कांॅग्रेसऐवजी धन्युष्यबाण चालला.
राकॉंचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडेंना स्वत:ची विश्वासार्हता यावेळी मेघेंसाठी सिध्द करण्याचे आवाहन आहे.
विधानसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस व भाजपसाठी आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मेघेंसाठी तीन, तसेच तडसांसाठीही तीन आमदार बाजी लावून आहेत. लोकसभा निवडणुकीचा कौल विधानसभेच्या वेळीही दिसून येईल, असे नाही, असे सांगणाऱ्या एका आमदाराने स्पष्ट केले की, गतवेळी दत्ता मेघे हे लाखाच्या मताधिक्याने निवडून येऊनही वर्धा जिल्ह्य़ात चार पैकी तीन विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस गारद झाली होती. उमेदवारीच्या निकषावर मतदान करण्याचा मतदारांचा पवित्रा राहिला. यावेळीही तसेच होईल, अशी मल्लिनाथी या आमदाराने केली.
भाजपच्या रामदास तडसांना काही भागात कॉंग्रेसी आमदारांकडून होणाऱ्या दगाफ टक्यावर आशा आहे, तर मेघेंना विरोधी आमदारांकडून मदतीची खात्री आहे. मेघे हे प्रचारासाठी एवढी शिधासामुग्री देतात की, त्यात आमच्या विधानसभेचेही भागते, असे गंमतीदारपणे सांगणाऱ्या एका आमदाराने अशी मदत मेघेंना विरोध करण्यास धजावू देत नाही.
स्वपक्षीय आमदारांसोबतच गतवेळी मेघेंनी एका विरोधक आमदाराला गळ्याला लावत बाजी मारल्याचे पुढे दिसून आले होते. वडिलांच्या चार निवडणुकीचे सारथ्य करणाऱ्या व यावेळी स्वत: उमेदवार झालेल्या सागर मेघेंनी सर्व सहाही मतदारसंघात स्थानिक कॉंग्रेस नेते व त्यांचे विरोधक अशा दोघांनाही कामाला लावल्याचे दिसून येते. धामणगावात ही बाब उघडपणे दिसून येते. विद्यमान सर्व आमदारांना स्वत:च्या मतदारसंघात पक्षाचे नाक कापले जाऊ नये, याची चिंता लागल्याचे मात्र दिसून येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवणाऱ्या आमदारांपुढे मताधिक्याचे आव्हान
चार महिन्यानेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून स्वत:च्या मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्याचे आव्हान प्रमुख पक्षांच्या विद्यमान आमदारांवर येऊन पडले आहे.
First published on: 05-04-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mla keep eyes on assembly election