मालेगाव बॉम्बस्फोटानंतर आरोग्य व्यवस्थेवर पडलेला वाढता ताण लक्षात घेऊन मालेगाव येथे सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यावेळी आरोग्य विभागाची शैली ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ अशीच राहिली. रुग्णालय सुरू झाल्यानंतर झालेल्या नियुक्ता या अस्थायी स्वरूपाच्या असल्याने वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप अस्वस्थता आहे. त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा प्रश्न सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. दुसरीकडे, रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मालेगाव शहरातील आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा असतांना ती फोल ठरली आहे. रुग्णालयाच्या कारभाराबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे.
मालेगाव शहर परिसरात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ मृत्यूमुखी तर २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. त्यांना आवश्यक आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यात सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडत होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मालेगाव येथे तातडीने भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण, अपुऱ्या सोयी सुविधा आदींचा पाढाच यावेळी बहुतेकांनी सोनिया गांधी यांच्यासमोर वाचला. त्याची दखल घेत गांधी यांनी केलेल्या सुचनेनुसार मालेगाव येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्यात आले. २००९ मध्ये या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, क्ष-किरण शास्त्रज्ञ, शरीरविकृती चिकित्सक, मनोविकृती चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक, रक्तपेढी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांसह विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. तसेच ३०० पेक्षा अधिक चतुर्थश्रेणी कामगारांचीही नेमणूक करण्यात आली. यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांची नेमणूक अस्थायी स्वरूपात राहिली.
प्रत्येक वर्षी अस्थायी नियुक्तीवर असलेले वैद्यकीय अधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कामगारांना मुदतवाढ देत प्रशासनाने वेळकाढुपणाचे धोरण स्विकारले आहे. या पदांवरील खर्च हा अनुदानातून भागविण्यात येत आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, स्थायी कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने देण्यात येणारे लाभ, त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना यांचा लाभ घेता येत नाही. काम करूनही मिळणारा अल्प मोबदला यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष तसेच असुरक्षिततेची भावना आहे.
दुसरीकडे, रुग्णालयात वेगवेगळ्या कामांसाठी पैशांची मागणी केली जाते. रुग्णालयात स्वच्छता नाही. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे येणाऱ्या रुग्णांशी सतत उडणारे खटके, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीसह अपुरे मनुष्यबळ आदीं तक्रारी रुग्णालयाच्या कामकाजाविषयी होत आहेत.
केवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी हंगामी
मालेगाव सामान्य रुग्णालयात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र चतुर्थश्रेणी कामगारांची नियुक्ती विशेष बाब म्हणून कंत्राटी पध्दतीने करण्यात आली आहे.
– डॉ. बी. डी. पवार (आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग)