दक्षिण मुंबईत राणीचा नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्हच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी लवकरच प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी आतापर्यंत केवळ दोन कंत्राटदार पुढे आले असून दोघांनी अपेक्षित खर्चापेक्षा १५ टक्के अधिक रकमेच्या निविदा सादर केल्या आहेत. मात्र या दोन्ही कंपन्यांचा पूर्वेतिहास फारसा चांगला नाही. त्यामुळे मरिन ड्राइव्ह चकाचक होणार का, असा सवाल विचारला जात आहे.
या रस्त्यासाठी निविदा सादर केलेल्या आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट व केआर कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंत्राटदारांचा इतिहास फारसा चांगला नाही. या दोन्ही कंपन्या पालिकेसोबत १५ वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट (आधीचे आर पी शाह) यांना २०१३ मध्ये ३२० कोटी रुपयांचे काँक्रिटीकरण तसेच डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. पालिकेच्या शाळेचे निकृष्ट बांधकाम केल्याप्रकरणी इमारत विभागाने दोन वर्षांपूर्वी या कंपनीचे मानांकन कमी केल्यानंतरही हे काम त्यांना सोपवण्यात आले होते हे विशेष. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टसोबत केआर कन्स्ट्रक्शनला नोव्हेंबर २०१२ मध्ये २६८ कोटी रुपयांचे रस्ता डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते.
रस्त्याचे काम निकृष्ट होण्यासाठी केवळ कंपन्यांना जबाबदार धरता येणार नाही. रस्त्याचे काम उत्कृष्ट होण्यासाठी यावेळी अटी घालण्यात आल्या आहेत. रस्त्याचा हमी कालावधीही वाढवण्यात आला आहे. हा रस्ता महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्याबाबत कोणतीही जोखीम घेण्यात येणार नाही, असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले.
मरिन ड्राइव्हच्या रस्त्याला नूतनीकरणाची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. आधी ठरवल्याप्रमाणे रस्त्याखालून जात असलेल्या मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम अंतर्भूत करण्यात आलेले नाही.
मात्र या रस्त्यांच्या मध्यभागी झाडे लावून सौंदर्यीकरणाचे काम यात समाविष्ट आहे. निविदेतील अटीनुसार रस्त्याचा पृष्ठभाग तयार करणे, दुरुस्ती करणे असे सर्व काम पावसाळ्याच्या चार महिन्यांसह दहा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. योजनेनुसार गिरगाव चौपाटी ते मादाम कामा रोड हा रस्त्याचा ७० टक्के भाग मॅस्टीक वापरून बनवण्यात येईल. त्यात उच्च प्रतीचे बिटुमीन वापरण्यात येत असल्याने रस्त्याचे आयुष्यमान वाढेल. रस्त्याच्या इतर भागाचे काँक्रीटीकरण केले जाईल.
आम्ही लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडणार आहोत. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्यात पूर्ण करावे लागणार असून त्यासंदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यावर लगेचच कामाला सुरुवात होईल, असे श्रीनिवास म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine drive renovation soon