शाळा तसेच संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी अनिष्ट मार्गाचा अवलंब करीत शिष्यवृत्ती परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना उघडपणे सामूहिक कॉपी करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामध्ये बोकाळली असून त्याचे प्रतिबिंब निकालातही उमटल्याचे दिसून आले आहे. विशेषत: २०११ आणि २०१२ च्या परीक्षांमध्ये शहरी विभागापेक्षा ग्रामीण भागातील पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कितीतरी चांगला लागला. सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी दुर्गम मानल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यातील होते. सामूहिक कॉपीचाच हा प्रताप होता. परीक्षा पद्धतीतील उणिवांमुळेच ही अनिष्ट प्रथा बोकाळली. कॉपीच्या मार्गाने मिळालेल्या या यशामुळे ‘त्या’ मुलांना आणि त्यांच्या पालकांना क्षणिक आनंद वाटत असला तरी पुढील वाटचालीत या खोटय़ा गुणवत्तेचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही. उलट प्रामाणिकपणे अभ्यास करून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र त्यामुळेच निश्चितच हिरमोड होतो. शहापूरमधील नॉलेज अॅकॅडमी ही संस्था गेली काही वर्षे शिष्यवृत्ती परीक्षा अधिक चांगल्या प्रकाराने घेतली जावी म्हणून प्रयत्नशील असून सातत्याने शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धापरीक्षांचा सराव व्हावा यासाठी शहापूरमधील काही शिक्षक शहापूर नॉलेज अॅकॅडमीच्या माध्यमातून विनामूल्य मार्गदर्शन वर्ग भरवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पूर्व प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे वर्गही अॅकॅडमीच्या वतीने घेतले जातात. जिल्ह्य़ातील सामूहिक कॉपीच्या अनिष्ट प्रथेचा या संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी शिक्षण विभागाने त्याची दखल घेऊन काही उपाययोजना केल्या. त्यामुळे सामूहिक कॉपी प्रकार बऱ्याच प्रमाणात थांबून अधिक वास्तववादी निकाल लागला. मात्र तरीही परीक्षा पद्धतीत सुधारणेला बराच वाव आहे.
..तरच खरीखुरी परीक्षा!
यंदा रविवार, १६ मार्च रोजी पूर्वप्राथमिक तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर शहापूर नॉलेज अॅकॅडमीने जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला एक निवेदन दिले असून त्यात काही उपाय सुचविले आहेत. परीक्षा केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षक दुसऱ्या तालुक्यातील असावेत. परीक्षा काळात भरारी पथकांची संख्या वाढवून त्यामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकारांची नियुक्ती करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दहावी-बारावीनंतर सर्वानाच स्पर्धापरीक्षांना सामोरे जावे लागते. चौथी आणि सातवीत शिष्यवृत्ती परीक्षांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्याचा सराव होतो. पुढील इयत्तांच्या अभ्यासासाठीही त्याचा उपयोग होतो, पण सामूहिक कॉपी प्रकारामुळे या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही अन्याय होतो. त्यामुळे शिक्षण विभागाने गांभीर्याने कार्यवाही करून कॉपीचे प्रकार रोखावेत, असे आवाहन अॅकॅडमीने केले आहे.