डाव्या लोकशाही आघाडीतील जागावाटपाची बैठक ७ जानेवारी रोजी होणार आहे. मराठवाडय़ातील परभणीची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढविणार असून, हिंगोलीची जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढविणार आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा समाजवादी पक्षाची आहे. त्यांनी अद्याप त्यावर दावा केलेला नाही. त्यामुळे येथून लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पक्ष घेईल, असे डॉ. भालचंद्र कांगो यांनी सांगितले.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या ११व्या द्वैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात डॉ. कांगो यांना श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार देण्यात आला. या वेळी डॉ. कांगो यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घालण्यात आली. या पुढच्या काळात राजकीय लढाई अधिक टोकदार करावी लागेल, असेही डॉ. कांगो म्हणाले. मात्र, निवडणूक लढवण्यास ते तयार आहेत काय, असे रविवारी विचारले असता ते म्हणाले, ‘कालच्या कार्यक्रमात काही जणांनी इच्छा व्यक्त केली. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षच ठरवेल. येत्या ७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत या अनुषंगाने चर्चा होऊ शकेल. ही जागा समाजवादी पक्षाची होती. त्यामुळे त्यांचा काय निर्णय होतो, हे पाहूनच पुढचे ठरविले जाईल.’
अधिवेशनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सत्काराच्या वेळी डॉ. कांगो यांनी देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पंडित नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्थेवर जी मंडळी पोसली गेली, त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमधून ज्यांचे भरणपोषण आणि वैचारिक मूस तयार झाली, तेच नेहरूंच्या धोरणावर आता टीका करू लागले आहेत. भारतीय अर्थकारणाला वेगळे आयाम डाव्या चळवळीमुळेच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच वातावरण डाव्या चळवळीने निर्माण केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरितक्रांती या सगळय़ा घडामोडींमागे डावा विचार होता. मात्र, तो पद्धतशीरपणे दडविण्याचे कसब काँग्रेसकडे होते. त्यामुळे अधिक तपशील लोकांपर्यंत जायला हवे. जे काम डाव्यांनी केले, त्याचा राजकीय फायदा मात्र ‘आप’सारख्या पक्षाने घेतला. आता वातावरण चांगले आहे. त्यामुळे ही राजकीय लढाई अधिक टोकदार केली पाहिजे, असे ते म्हणाले होते. या पाश्र्वभूमीवर डॉ. कांगो निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. तथापि, उमेदवारीविषयीचे सर्व निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतले जातील. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्याचा विचार होईल.