स्थानिक संस्था कर रद्द करा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही शहर व परिसरात पूर्णपणे फज्जा उडाला. मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने वगळता बहुतांश दुकाने नेहमीप्रमाणे उघडी होती. या आंदोलनाच्या निमित्ताने व्यापारी संघटनांमध्ये गट-तट पडले. अनेक व्यावसायिक बंदमध्ये सहभागी न झाल्यामुळे ग्राहकांना बंदची झळ बसली नाही. व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडून शासन आंदोलनास खीळ घालत असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे. पेट्रोलपंप बंद राहिल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागला.
जकातही नको आणि स्थानिक संस्था करही नको, या मागणीसाठी फामच्यावतीने दोन दिवस राज्यस्तरीय बंद पुकारण्यात आला. आंदोलनाच्या सुरूवातीपासून व्यापारी वर्गात फाटाफूट झाली होती. मंगळवारी त्याची प्रचिती आली. कापड बाजार, हॉटेल्स, शालेय साहित्य विक्रेते तसेच भ्रमणध्वनीची दुकाने नियमीतपणे सुरू होती. यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी फारशी धावपळ करावी लागली
नाही. पावसाने काही काळासाठी उघडीप घेतल्याने लग्नसराईच्या मुहूर्तावर खरेदी करण्याकडे अनेकांचा कल राहिला. रविवार कारंजा, मेनरोड, सिडको, नाशिकरोड, सातपूर परिसरातील बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरू होत्या.
परंतु, घाऊक किराणा माल विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहिल्याचा दावा नाशिक व्यापारी महासंघाचे प्रफुल्ल संचेती यांनी केला. बंदला हार्डवेअर, सिरॅमिक, मार्बल आदी व्यवसायिकांनी पाठिंबा
दिला आहे.
कापड विक्रेत्यांनी एक टक्का जकातीपेक्षा २ टक्के स्थानिक संस्था कर मान्य करून आंदोलनातून माघार घेतली आहे. कापड व्यापारी संघाच्या अध्यक्षांकडून व्यवसायिकांची दिशाभूल करण्यात आली आहे. यामुळे कापड व्यवसायिकांनी बंद काळात दुकाने सुरू ठेवली. महासंघाने सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित आणण्याचे काम केले. मात्र, सध्या सरकारच्या लवचिक धोरणामुळे आंदोलनात फूट पडण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नाशिकरोड सराफ संघटनेने बंदला पाठिंबा दिला. मात्र नाशिक जिल्हा सराफ असोसिएशने बंदमधून माघार घेतली. राज्यस्तरीय सराफ असोसिएशनने सरकारशी चर्चा करून व्यवसायात आवश्यक ते बदल करून घेतले असल्याचे संचेती यांनी सांगितले. सरकारची ही वृत्ती घातक असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये फूट पडत आहे. वेळोवेळी नव्या करात बदल करण्यापेक्षा तो कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी संचेती यांनी केली. पेट्रोलपंप बंद राहिल्याने वाहनधारकांची अडचण झाली. या दिवशी अनेकांना इंधनाअभावी वाहने बंद ठेवणे भाग पडले. काही वाहनधारकांनी शहराबाहेर धाव घेऊन इंधन भरणे पसंत केले. पेट्रोलपंपचालकांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
व्यापाऱ्यांचा ‘बंद’ केवळ नावापुरता..
स्थानिक संस्था कर रद्द करा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही शहर व परिसरात पूर्णपणे फज्जा उडाला. मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने वगळता बहुतांश दुकाने नेहमीप्रमाणे उघडी होती.
First published on: 17-07-2013 at 11:50 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merchants strike mere to say