जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर प्रकल्पात ठरल्याप्रमाणे जागा न दिल्याबद्दल कारवाईचा इंगा दाखवत बडय़ा बिल्डरांकडून ‘म्हाडा’ने जवळपास ६५ हजार चौरस फूट जागा ताब्यात घेतली असून आता ‘डीबी रिअॅल्टी’ या राजकीयदृष्टय़ा ‘पॉवर’फुल असलेल्या बिल्डरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘डीबी रिअॅल्टी’ समूहाच्या ‘बलवा इस्टेट’ या नावाने राबवलेल्या पुनर्विकास प्रकल्पात तब्बल १९,३३८ चौरस फूट जागा दाबून ठेवली आहे. आता ही जागा येत्या काही महिन्यांत ताब्यात घेण्यासाठी ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या मोबदल्यात ‘म्हाडा’ला जागा देण्याचे बंधन होते. पण ३३ बिल्डरांनी सर्व नियम धाब्यावर बसवत ‘म्हाडा’ला ठेंगा दाखवला आणि सुमारे एक लाख २२ हजार चौरस फूट जागा खिशात घातली. कसल्याही कारवाईची भीती नसल्यानेच बिल्डरांनी हे दु:साहस केले. सर्वसामान्यांच्या हक्काची ही जागा बिल्डरांकडून परत मिळवण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या आदेशानुसार ‘म्हाडा’ने या ३३ बिल्डरांना पुन्हा एकदा जागा देण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार एक-एक प्रकरण हातावेगळे करण्यात येत आहे. नुकतीच ‘सुमेर समूहा’कडून ११४ घरे घेण्यात ‘म्हाडा’ला यश आले.
माटुंगा, दादर, प्रभादेवी, मुंबई सेंट्रल, भायखळा, माझगाव आदी ठिकाणी या जागा असल्याने सर्वसामान्यांना मुंबईच्या मध्यवर्ती भागात हक्काचे घर मिळण्याची संधी आहे.
‘सुमेर समूहा’कडून जागा ताब्यात घेण्यात यश आल्यानंतर इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने आता दुसऱ्या ‘बडय़ा माशां’वर लक्ष केंद्रित केले आहे. राजकीय लागेबांधे असलेल्या ‘डी. बी. रिअॅल्टी’ या बिल्डरने ‘बलवा इस्टेट’ नावाने ताडदेव भागात उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प राबवला. यात त्यांनी ‘म्हाडा’ला १९,३३८ चौरस फूट जागा देणे अपेक्षित आहे. पण इतरांप्रमाणे त्यांनीही ती दाबून ठेवली. त्यामुळे आता ही जागा मिळवण्यासाठी ‘म्हाडा’ने जोरदार हालचाली सुरू केल्याचे समजते.
याबाबत इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी मोहन ठोंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, एकूण साडेतेरा हजार चौरस मीटर जागा ३३ बिल्डरांकडे प्रलंबित होती. ‘म्हाडा’ला ती सोपवली जात नव्हती. कारवाई सुरू केल्यानंतर आता एक-एक बिल्डर जागा देत आहे. ‘डी. बी. रिअॅल्टी’ने सुमारे १९ हजार चौरस फूट जागा ‘म्हाडा’ला देणे बाकी आहे. त्यांनी काही तांत्रिक मुद्दे पुढे केले आहेत. पण ते लवकरात लवकर मार्गी लावून येत्या काही महिन्यांत ही जागाही ‘म्हाडा’च्या ताब्यात येईल, असे ठोंबरे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘बलवा इस्टेट’कडे ‘म्हाडा’ची १९,३३८ चौरस फूट जागा प्रलंबित
जुन्या इमारतींच्या पुनर्विकासानंतर प्रकल्पात ठरल्याप्रमाणे जागा न दिल्याबद्दल कारवाईचा इंगा दाखवत बडय़ा बिल्डरांकडून ‘म्हाडा’ने जवळपास ६५ हजार चौरस
First published on: 08-10-2013 at 06:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada 19 338 square feet of space pending in balwa estate