हिंदी चित्रपटांमध्ये तद्दन मसालापटांप्रमाणेच नायककेंद्री नसलेले आणि छोटा जीव असलेले परंतु नवी मांडणी असलेले काही चित्रपट जानेवारीपासून झळकले आहेत. ‘मिकी व्हायरस’ हा त्यापैकीच एक चित्रपट असून माहिती तंत्रज्ञानाचे वेड असलेल्या आजच्या पिढीची मानसिकता अधोरेखित करणारा, धमाल थ्रिल मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.
सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शिरला की पूर्ण सिस्टिम हळूहळू नष्ट करण्याची ताकद त्याच्यात असते. म्हणून पर्सनल कम्प्युटर असो की मोठय़ा सव्र्हरवरील अनेक संगणक असोत प्रत्येक संगणकात अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर टाकावे लागते. व्हायरस तयार करणारे अनेक तज्ज्ञ आहेत, तसेच अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर बनविणारेही आहेत. संगणकक्रांती झाल्यानंतर जन्माला आलेली नवी जमात म्हणजे हॅकर्स. आपण अधूनमधून पेपरमध्ये वाचतो की अमुक तमुक नामांकित व्यक्तीची, कंपनीची अथवा सरकारची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. हॅकिंगचा धोका विशेषत: संगणकाद्वारे पैशांचे व्यवहार करणाऱ्या यंत्रणेला अधिक असतो. नेमके हेच हेरून लेखक-दिग्दर्शकाने मिकी व्हायरस या आपल्या नायकाला निष्णात हॅकर बनविले आहे. मिकी व्हायरस, चटनी, पांचो आणि फ्लॉपी आणि या सगळ्यांचा मित्र आणि हॅकिंगचा बादशहा प्रोफेसर. मुळात संगणकाशी खेळण्याची नितांत आवड असलेले पहिले चारजण प्रोफेसरकडून हॅकिंग, व्हायरस तयार करून लोकांच्या संगणकात सोडणे इत्यादी संगणकाशी नाना गैरप्रकार शिकून घेतात. त्याद्वारे आपला चरितार्थ चालविणे हाच यांचा पोटापाण्याचा उद्योग आहे. हॅकिंगवाल्यांचा दिल्लीत एक अड्डा आहे. तिथे बसून हे सगळे अनेक उद्योग करतात. मिकी व्हायरसने बनविलेला एक कूंग फू चमेली नावाचा गेम बनविला आहे. तो अल्पावधीत लोकप्रिय होतो. त्यातील चमेलीसारखी एक सुंदर तरुणी मिकी व्हायरसला अचानक एका भाजीबाजारात दिसते. आणि मग आपला नायक मिकी तिच्या प्रेमात पडतो. दरम्यान हॅकर्सचे एकामागून एक दोन-तीन जणांची हत्या होते. आणि त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका निष्णात हॅकरची गरज भासते. मिकी व्हायरसला ते गाठतात आणि मग सुरू होतो एक अजब-गजब गेम. पोलिसांना मदत करताना मिकी व्हायरस एका चक्रव्यूहात अकडतो.
लेखक-दिग्दर्शकाने दिल्लीचे ठग या उक्तीनुसार दिल्लीत घडणारी मिकी व्हायरसची गोष्ट पडद्यावर मांडली आहे. संगणकाच्या ‘व्हच्र्युअल’ विश्वात रमलेले चार-पाच तरुण-तरुणी अन्य कशाचाही विचार करीत नाहीत. हे दिग्दर्शक मुख्य चार व्यक्तिरेखांच्या माध्यमात प्रेक्षकाला दाखवून देतो. सदान्कदा संगणकाला नाक लावून हॅकिंग, व्हायरस, नवीन सिस्टिम्स तयार करून ती ब्रेक करण्याचे नवीन फंडे शोधत राहणे हेच या तरुणांचे जगणे बनले आहे. एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठीही या ‘संगणकतज्ज्ञ’ तरुणांचा मेंदू वापरला जाऊ शकतो हेही दिग्दर्शकाने पोलिसांची मदत करणारा मिकी व्हायरस दाखवून अधोरेखित केले आहे.
दिल्लीतील मध्यमवर्गीय तरुणाईची भाषा चित्रपटात वरचेवर येते. त्याचबरोबर संगणकीय शब्दांचा संवादांमधून वापर दिग्दर्शकाने केला आहे. रेडिओ जॉकी, व्हिडीओ जॉकीनंतर टीव्हीवरील कार्यक्रमांचा सूत्रसंचालक अशा विविध क्षेत्रांतून आता मनीष पॉल ‘मिकी व्हायरस’द्वारे रुपेरी पडद्यावर आला आहे. मूळचा दिल्लीचा असल्यामुळे त्याची निवड या भूमिकेसाठी करणे योग्य म्हणावे लागेल. मिकी व्हायरसला चटनी अर्थात पूजा गुप्ता, फ्लॉपी अर्थात राघव कक्कर, पांचो म्हणजे विकेश कुमार यांनी चांगली साथ दिली आहे. चित्रपटाचा केंद्रबिंदू हॅकिंग आणि त्यातून घडणारे गुन्हे आणि मग त्याची उकल हा असल्यामुळे दिग्दर्शकाने चार प्रमुख व्यक्तिरेखांचे कुटूंबीय, हे सगळे संगणकवेडे कसे बनले, बेकायदेशीररीत्या संगणकातील उद्योग करून उदरनिर्वाह करणे हे यांना का करावेसे वाटले हे सगळे दाखविलेले नाही. पोलीस अधिकारी सिद्धान्त चौहान ही व्यक्तिरेखाही मनीष चौधरीच्या चांगल्या अभिनयामुळे लक्षात राहणारी आहे. धमाल थ्रिलरपट असलेला हा चित्रपट करमणूक करण्यात चांगला यशस्वी ठरतो.
मिकी व्हायरस
दार मोशन पिक्चर्स निर्मित
निर्माते – अरुण रंगाचारी, विवेक रंगाचारी पटकथा- दिग्दर्शक – सौरभ वर्मा, कथा – गौरव वर्मा, सौरभ वर्मा, एलिन राजा, छायालेखन – अंशुमान महाले संगीत – हनीफ शेख, कलावंत – मनीष पॉल, मनीष चौधरी, एली अवराम, वरुण बडोला, पूजा गुप्ता, नीतेश पांडे, राघव कक्कर, विकेश कुमार व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2013 रोजी प्रकाशित
धमाल थ्रिलरपट
हिंदी चित्रपटांमध्ये तद्दन मसालापटांप्रमाणेच नायककेंद्री नसलेले आणि छोटा जीव असलेले परंतु नवी मांडणी असलेले काही चित्रपट

First published on: 27-10-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mickey virus a comical bollywood thriller