मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारा मानाचा म्हैसकर ‘मिक्ता २०१३’ हा नाटय़-चित्रपट महोत्सव यंदा पुण्यात होणार आहे. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत महोत्सवाच्या प्राथमिक फेरीसाठी निवडण्यात आलेल्या दहा नाटकांचे प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे तर, दहा चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन कोथरूड येथील सिटी प्राईड येथे करण्यात आले आहे.
‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अ‍ॅवॉर्डस’ सोहळ्याचे आयोजन यंदाही अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून साकरण्यात येत आहे. म्हैसकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र कलानिधी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे. पुण्यात होणाऱ्या या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सहभागी होऊन त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये होणाऱ्या ‘मिक्ता २०१३’ नाटय़महोत्सवासाठी ‘प्रपोजल’, ‘गेट वेल सून’, ‘ठष्ट’, ‘डू अँड मी’, ‘एकदा पहावं न करून’, ‘फॅमिली ड्रामा’, ‘सुखान्त’, ‘ड्राय डे’, ‘उणे पुरे शहर एक’ आणि ‘ती गेली तेव्हा’ या दहा नाटकांची तर, चित्रपट महोत्सवासाठी ‘दुनियादारी’, ‘टाईम प्लीज’, ‘आजचा दिवस माझा’, ‘७२ मैल : एक प्रवास’, ‘बालक-पालक’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘अनुमती’, ‘आयना का बायना’ आणि ‘धग’ या दहा चित्रपटांची निवड झाली आहे.