शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असल्याने शहरांजवळ असलेल्या ग्रामीण पट्टय़ात विकास कामांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत शहरी भागात विकासाचे लक्ष ठेवणाऱ्या ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा’ विकासाचा रोख यापुढे विकसित नवीन नागरीकरण होत असलेल्या भागाकडे असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.
आगरी युथ फोरमतर्फे आयोजित बाराव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपसभापती वसंत डावखरे, संयोजक गुलाब वझे, कोकण विभागीय आयुक्त राधेशाम मोपलवार, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘एमएमआरडीए’कडून ज्या गतीने विकासासाठी पावले उचलली पाहिजेत. तेवढय़ा गतीने ती उचलली जात नाहीत. यापुढील काळात या विभागाला गतिमान करून ‘एमएमआरडीए’चा विकास कामांचा सर्व रोख नागरीकरण होत असलेल्या शहरी, ग्रामीण पट्टय़ाकडे असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्ह्य़ाच्या भागातील कचरा क्षेपण केंद्र, विकास आराखडा या भागातील पालिकांचे काही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी येत्या महिनाभरात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत शक्यतो विकासाचे बहुतांशी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आगरी युथ फोरमला महाविद्यालयासाठी ‘एमआयडीसी’तील जो भूखंड पाहिजे तो न्यायालयीन निर्णय होईपर्यंत त्यांच्यासाठीच राखीव ठेवण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.