महापालिकेच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, असे उपायुक्तांनी सांगितल्याने परवानगी दिल्यास या इमारतीवरील छतावर पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण पक्षातर्फे करू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. वारंवार निवेदने देऊनही रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी काहीच न केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महापालिकेसमोर निदर्शने केली.
शहरातील मोठय़ा इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उच्च न्यायालयाची इमारत व अन्य सरकारी कार्यालयावर रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जात आहे. महापालिकेकडे मात्र यासाठी पैसाच नाही, असे सांगितले जात आहे. या अनुषंगाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्तांची भेट घेऊन ही उपाययोजना तातडीने करावी, अशी विनंती केली होती. केवळ सरकारी इमारतीवरच नाही तर खासगी विकासकांनी व प्रत्येक घरातून ही पुनर्भरणाची प्रक्रिया राबवावी, यासाठी महापालिकेने जनजागृती करण्याची गरज होती. ते तर केलेच नाही. उलट रेनवॉटर हार्वेस्टिंग निधीअभावी करू शकत नाही, असे सांगण्यात आले. महापालिकेकडे निधी नसेल तर परवानगी दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काम करून देईल, असे बुधवारी सांगण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, अरविंद धीवर व डॉ. शिवाजी कान्हेरे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2013 रोजी प्रकाशित
महापालिकेच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मनसे तयार
महापालिकेच्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, असे उपायुक्तांनी सांगितल्याने परवानगी दिल्यास या इमारतीवरील छतावर पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण पक्षातर्फे करू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

First published on: 28-06-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns ready for rainwater harvesting on corporation building