जिल्ह्य़ातील शिवसेनेअंतर्गत दुफळी वाढतच असून, शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसचे आमदार राजीव सातव व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात स्वपक्षीयांवर हल्लाबोल चढवून विरोधकांचे कौतुक केले.
हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेची स्पष्ट बहुमतासह सत्ता आहे. जि. प. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासूनच खासदार वानखेडे, तसेच माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे यांच्यात दोन गट पडले असून गेल्या वर्षभरापासून जि. प. चा कारभार वादाच्या भोवऱ्यात आहे. या पाश्र्वभूमीवर जवळाबाजार, मेथा, आखाडा बाळापूर, सालेगाव, भोगाव, कहाकर, हट्टा, वाकोडी, केळी आदी गावांमध्ये २८ ते ३० मार्चदरम्यान झालेल्या बहुतेक कार्यक्रमांत खासदार वानखेडे यांनी आमदार सातव, तर काही ठिकाणी आमदार दांडेगावकर यांच्या उपस्थितीत डॉ. मुंदडा, घुगे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. जि. प. सत्ता असताना प्रत्यक्षात ती राबवता मात्र येत नसल्याचे सांगून जि. प. ची १०० कोटींची मालमत्ता बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा डाव आपण हाणून पाडल्याचा दावा केला. जि. प. त वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केल्याने जिल्हाभर चर्चा होत आहे.