आग्रा येथील एकलव्य स्टेडियममध्ये नुकत्याच झालेल्या ५९ व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत येथील यशवंत व्यायामशाळेचे खेळाडू स्मित गर्गे आणि उत्कर्ष मोराणकर यांनी महाराष्ट्राकडून प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.
स्मित हा आरवायके महाविद्यालयात १२ वी इयत्तेत शिकत असून त्याने १९ वर्षांआतील वयोगटात रौप्यपदक मिळविले. तर, उत्कर्ष हा किलबिल सेंट जोसेफ शाळेत १० वीमध्ये शिकत असून त्याने १७ वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राने या स्पर्धेत सांघिक विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेआधी नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही या दोघांनी चांगली कामगिरी करून विभागीय संघात स्थान मिळविले. त्यानंतर अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करताना हीच लय कायम राखत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळविले.
हे दोन्ही खेळाडू यशवंत व्यायामशाळेत सहा वर्षांपासून नियमित सराव करत असून त्यांना प्रशिक्षक संदीप शिंदे, राज काळे, प्रितीश लेले यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे.