अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या आपत्तीचे यंदाच्या रंगपंचमीच्या उत्सवावर सावट असून शहरी भागात रंगात चिंब होण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र हा उत्सव साजरा होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. गतवर्षी पाणी टंचाईमुळे कोरडी रंगपंचमी खेळण्याकडे राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी लक्ष केंद्रीत केले होते. यंदा ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे हा सण साजरा होणार नसल्याची स्थिती आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या व टंचाईमुळे गतवर्षी खोदल्या न गेलेल्या ऐतिहासिक रहाडी दोन वर्षांनंतर प्रथमच उघडण्यात आल्या आहेत. येवल्यात नेहमीप्रमाणे रंगांचा सामना रंगणार आहे. रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर, शहरातील बाजारपेठेत रंगाचे अनेक प्रकार वेगवेगळ्या पिचकाऱ्यांसह उपलब्ध आहेत. परीक्षेचा माहोल तसेच उन्हाचा तडाखा असल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह जरा कमी आहे. यंदाही बाजारपेठेवर चीनी साहित्याचे वर्चस्व असले तरी नैसर्गिक रंग वापराकडे अनेकांचा कल आहे.
नाशिक जिल्ह्यात फाल्गुन पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. नाशिककरांचा उत्साहाला उधाण आणण्यासाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध केले आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी प्रबोधन होत असल्याने रंगप्रेमींनी रासायनिक रंगाऐवजी पर्यावरणपूरक रंगाना प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन नैसर्गिक रंग १० रुपयांपासून ८० रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत. तर युवकांची रासायनिक रंगाची क्रेझ पाहता डब्बीतील तसेच पुडीतील रंग ५० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. यंदा बाजारपेठेत प्रथमच ‘जादुचा रंग’ दाखल झाला आहे. रंग हातावर लावून समोरच्याच्या गालावर जाईपर्यंत काही काळ तो राहतो नंतर मात्र गायब होतो, हे या रंगाचे वैशिष्ठय़े. या रंगाच्या छोटय़ा बाटलीची किंमत ३० रुपये आहे. काही शाळांमध्ये नैसर्गिक रंग तयार करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे बच्चे कंपनीने घरी रंग बनविण्याचे प्रयोग केले.
मोठय़ा माणसांकडून रंगाची मुक्त हस्ताने उधळण होताना बच्चेकंपनी मात्र यातून काहीशी दूर राहते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांना ‘पिचकारी’ आवश्यक वाटते. बच्चे कंपनीची ही आवड लक्षात घेऊन विविध प्रकारच्या कार्टुनच्या आकारातील पिचकाऱ्या २० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बच्चे कं पनीच्या हट्टासाठी पालकांच्या खिशाला भरुदड पडत आहे. त्यात पारंपरिक पिचकाऱ्या आकार मानानुसार २० रुपयापासून २५० रुपयांपर्यंत आहेत. विविध आकारातील मासे, अँग्री यंग बर्ड, डोरोमन, छोटा भीम, स्पायडर मॅन, वाघ, साप, घडय़ाळ आदी प्रकारांचा त्यात समावेश आहे. या शिवाय टँक आकारातील पिचकारी १२० रूपयांपासून ४५० रुपयापर्यंत, बंदूक २० ते जास्तीतजास्त अंतरावर पाणी फेकणारी बंदुक ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रंग आणि पिचकाऱ्यांच्या साहित्यात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. या शिवाय अजूनही ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर उन्हाचा तडाखा आणि आता परीक्षेचा माहोल या कारणांमुळे ग्राहक अद्याप दुकानापर्यंत पोहचला असल्याचे रंग विक्रेत्या अपर्णा शहा यांनी सांगितले. मात्र, रंगपंचमीच्या दिवशी या स्थितीत बदल होईल अशी विक्रेत्यांना अपेक्षा आहे. शहरी भागात असा नूर असला तरी ग्रामीण भागात मात्र रंगपंचमी साजरी होण्याची शक्यता कमी आहे. गारपिटीने शेती पूर्णपणे उध्वस्त झाली असल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. त्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात हा सण साजरा होण्याची फारशी शक्यता नाही.