महिलांचे सर्वाधिक पाठबळ ज्या पक्षाकडे, त्या पक्षाचा मार्ग सुकर झ्र् सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार सुलभा खोडके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत ‘राजकीय मार्केटिंग’ च्या वाटा अधिक प्रशस्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील ‘सप्तभगिनीं’पैकी एक असलेल्या सुलभा खोडके आणि सरचिटणीस संजय खोडके यांचा हा ‘बिग इव्हेंट’ राजकीय वर्तुळाला चकित करणारा ठरला आहे.
नेहरू मैदानावर पार पडलेल्या महिला मेळाव्याच्या आयोजनात सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी शक्ती पणाला लावत केलेले उत्तम नियोजन हा अमरावतीच्या राजकीय वर्तुळासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य बाळगूनही सुलभा खोडके यांनी गेल्या तीन वर्षांत कार्यमग्नता ठेवल्याने त्यांना प्रदेश कार्यकारिणीत चिटणीसपदाचे बक्षीस मिळाले. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळे गट असले, तरी खोडके यांच्या गटाने मात्र आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या चिखलदरा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे, त्याचे प्रतिबिंब या मेळाव्यात पहायला मिळाले. महिलांचे सर्वाधिक पाठबळ ज्या पक्षाकडे, त्या पक्षाचा सत्तेचा मार्ग सुकर होतो, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळाव्यात सांगितले आणि महिलांची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे, असाही दावा केला. महिलांच्या लक्षणीय हजेरीने या मेळाव्याचा राजकीय लाभ उठवण्याची संधी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे.या मेळाव्यात सुलभा खोडके आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे या केंद्रस्थानी होत्या. अनेक नेत्यांनी त्यांचे कौतूक केले, पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुलभाताई आणि सुरेखाताई यांचा नामोल्लेख करीत आता स्टेजवरच्या महिला देखील संघटित झाल्या पाहिजेत, अशी कोपरखळी मारली.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत बडनेरा मतदार संघातून सुलभा खोडके यांना रवी राणा या नवख्या उमेदवाराकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला, त्यानंतर खोडके यांचा गट ‘बॅकफूट’वर गेला. पण, त्यांच्या गटाने कामगिरीच्या बळावर पक्षसंघटनेत आपले स्थान टिकवून ठेवले. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, पण काँग्रेसच्या साथीने सत्ता मिळवताना खोडके यांनी आखलेली व्यूव्हरचना महत्वाची ठरली होती. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने महिला शक्तीची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न खोडके यांच्याकडून केला जातो. पण, यंदाचा मेळावा खोडके यांच्यासाठी खास ठरला आहे. महिला धोरणावर चर्चा करण्यसाठी राज्यभर आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यांचा शुभारंभ अमरावतीपासून झाला आहे. एकनिष्ठ मतदार वर्गाला सांभाळणे ही राजकीय पक्षांसाठी मोठी कठीण बाब होऊन बसलेली असताना खोडके यांना मात्र महिला वर्गाची साथ मिळत आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून सुलभा खोडके यांनी ही शक्ती संघटित केली आहे. सिद्धीविनायक महिला बचत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. हाच धागा पकडून खासदार सुप्रिया सुळे यांनीही मेळाव्याच्या चांगल्या नियोजनाचे कौतूक केले. या मेळाव्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळली होती. कार्यकर्त्यांचा संच दिमतीला असल्याने गोंधळ उडाला नाही. मेळावा पार पडल्यानंतर त्याचीच चर्चा होती.