केबल डक संदर्भात राज्य शासनाने नवे धोरण तयार केले असून त्याप्रमाणे मोबाईल सेवा देणारी कंपनी रस्ते खोदून केबल टाकणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली असून यामुळे महापालिकेला २७ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. या सोबतच २६ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
केबल डक संदर्भात महापालिकेने एक धोरण तयार केले आहे. त्यामुळे केबल टाकण्यासाठी कुणालाही खोदकाम करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या केबल डक धोरणाला मंजुरी मिळताच राज्य शासनाचे धोरण हद्दपार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या २००६ च्या धोरणमानुसार केबल डक टाकणारी कंपनी १० पैकी ८ कोर हे महापालिकेला हस्तांतरित करीत होते महापालिकेने या संदर्भात नवे केबल डक धोरण निश्चित केले. त्यानुसार सांडपाणी व पाईप लाईन यांच्या मदतीने केबल टाकण्यात येणार आहे. यामुळे खोदकाम करण्याची आवश्यकता नसेल. यातून महापालिकेला ४० कोटींच्यावर उत्पन्न होणार आहे. हे धोरण मंजूर करून पाठविण्यात आले असून राज्य शासनाकडे ते प्रलंबित आहे. दरम्यान, राज्य शासनाने एक धोरण तयार केले आहे. त्यानुसार मोबाईल सेवा देणारी कंपनी आपल्या गरजेनुसार केबल डक टाकणार आहे. ‘स्ट्रेंच लेंस’ प्रणालीचा वापर करून खड्डे करण्यात येणार आहेत. हे खड्डे किमान एक मीटर खोल असणार आहेत. ६१० रुपये प्रती मीटर रिनिंग त्याच प्रमाणे ६.५० टक्के प्रमाणे सेवाकर प्रमाणे रक्कम मिळणार आहे. रिलायन्स कंपनीने १९८ किलो केबल डक लाईन टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेच्या धोरणानुसार कुणालाही खोदकाम करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. महापालिकेच्या धोरणाला मंजुरी मिळताच राज्य शासनाचे धोरण हद्दपार होण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्य़ात हत्तीरोगाचे ४४ रुग्ण
प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ात १२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असता त्यात ४४ नागरिकांमध्ये हत्तीरोगाचे जंतू आढळून आले. त्यामुळे या रोगाच्या निर्मूलनासाठी जिल्ह्य़ात लवकरच सामूदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच आरोग्य विभागाचे सभापती चंद्रशेखर चिखले यांनी दिली.
आरोग्य समितीच्या बैठकीचे खेडकर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चिखले होते. यावेळी समितीचे सदस्य जयकुमार वर्मा, संध्या गावंडे, सरिता रंगारी, शकुंतला वरकाडे, माया कुसुंबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्य़ात सुरू असलेल्या साथरोगावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी सूचना चिखले यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली. तालुका स्तरावर साथरोग नियंत्रण पथक स्थापन करून साथरोग अधिकारी, ग्रामसेवकांचे सहकार्य घ्यावे, असेही सूचवण्यात आले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापसंदर्भात तपासण्यात आलेल्या रक्त नमुन्यात १९ रुग्णांमध्ये रक्त दूषित आढळून आले. अशा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील २६३६ नागरिकांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ात २२३४ पाण्याचे नमुने तपासले असून त्यात ८४ नमुने दूषित आढळून आले. दूषित पाणी आढळून आलेल्या गावात पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.