अडीच महिन्यापासून देऊळगावराजा शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे शहरातील बांधकामांवर मात्र भरपूर पाणी उधळले जात आहे. पाण्याची ही उधळण त्वरित थांबवावी, असे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत दिले होते. परंतु, या आदेशाला नगरसेवकासह शहरवासीयांनीच केराची टोपली दाखविली आहे.
देऊळगावराजा शहरात सुमारे चाळीस ते पन्नास बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. हे बांधकाम थांबविण्यास नगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. शहरातील पाणीटंचाई पाहता सुरू असलेली बांधकामे तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे सावखेड भोई व पीर कल्याण धरण ऐन हिवाळ्यात कोरडे ठाक  पडले आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात येण्यासाठी खडकपूर्णावरून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. परंतु, या योजनेला किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मात्र शहर टॅंकरवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत शहराला २८ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, हे टॅंकरही नागरिकांची तहान भागविण्यास अपयशी ठरत आहेत. एका बांधकामावर दररोज हजारो लिटर पाण्याचा वापर करण्यात येत आहे. त्यात भास्करराव शिंगणे नगर, सिव्हील कॉलनी, माळीपुरा, बालाजी नगर, भगवान बाबा नगर, दुर्गा पुरा आदी भागांचा समावेश आहे. या बांधकामांमध्ये नगरसेवकांच्या बांधकामांचाही समावेश आहे. शहराला दररोज ११ लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंतु, सद्यस्थितीत टॅंकरद्वारे आठ लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तीन लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे.