फॅशन किंवा वस्त्र उद्योगामधील भारताइतकी संपन्नता क्वचितच जगतल्या इतर कोणत्याही देशामध्ये पाहायला मिळते. भारतातील विविध राज्ये वेगवेगळ्या प्रकारचे कापड, कलाकुसर, कापडावरील चित्रकला आणि एम्ब्रॉयडरीसाठी ओळखली जातात. गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये वेळोवेळी होणाऱ्या फॅशन वीक्समध्ये डिझायनर्स आपल्या प्रांताच्या वैशिष्टय़पूर्ण संस्कृतीचा वापर करून कलेक्शन्स सादर करण्याकडे भर देत आहेत. भारतात महत्त्वाचे समजले जाणारे दोन फॅशन वीक म्हणजेच मुंबईचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ आणि दिल्लीचा ‘अ‍ॅमेझॉन इंडिया फॅशन वीक’ यामध्ये आपले कलेक्शन दाखविण्यासाठी डिझायनर्समध्ये सतत स्पर्धा होते. दोन वर्षांमध्ये या दोन्हीपैकी भारताच्या ईशान्येकडील राज्यातील डिझायनर्स मुंबईमध्ये होणाऱ्या फॅशन वीकला जास्त पसंती देऊ लागले आहेत आणि यामागे दिल्लीसारख्या शहरांमध्ये सर्रास दिसणारी अरेरावी, वंशभेदावरून आणि हीन वागणूक ही कारणे असल्याचे डिझायनर्स सांगतात.
लॅक्मे फॅशन वीकच्यामध्ये कलेक्शन सादर करत आपल्या फॅशन डिझायनिंगच्या कारकिर्दीची सुरवात करणारा डिझायनर असा काझिंगमी असो किंवा यंदा बंदुकीच्या प्रिंट्सवर आधारित कलेक्शननी सर्वाना थक्क करणारे डिझायनर्स तेरेसा लैसोम आणि उत्सवप्रधान असोत. यांच्यातील साम्य म्हणजे तिघेही ईशान्येकडील राज्यांतील आहेत. भारताच्या सात बहिणी म्हणून ओळखली जाणारी ईशान्येकडील सात राज्ये त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण संस्कृतीने संपन्न आहेत. मात्र पेहरावावर असलेली आदिवासी संस्कृतीची छाप, गडद रंगांचा वापर या कारणांमुळे कित्येक वर्ष ही राज्ये फॅशनच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिली. पण कित्येक मिझोरामी, आसामी, नागालँडच्या तरुण फळीतील डिझायनर्सनी फॅशनक्षेत्रामध्ये आपला पाय रोवण्यासाठी धडपड करण्यास सुरवात केली आहे.
त्यातील काहींना यशही आले असून माध्यमांनाही त्यांनी आपल्या कलेक्शन्सनी दखल घेण्यास भाग पाडले आहे. फॅशन वीकमधील या डिझायनर्सची हजेरी जाणवू लागली आहे. मणीपुरचा डिझायनर सैलेक्स सध्या बॉलिवूडचा लाडका डिझायनर आहे. डिझायनर डॉनिअल सियम, डिझायनर शोवित दासगुप्ता, डिझायनर दुर्बा नाग, डिझायनर शरण कौर, डिझायनर पेला यांच्या कलेक्शन्सनी समीक्षकांना थक्क केलंय. पण प्रवासाच्या दृष्टीने जवळ आणि सोयीचे असलेल्या दिल्लीऐवजी ही तरुण मंडळी मुंबईमधील फॅशन वीकला हजेरी लावण्यास प्राधान्य देताना दिसतात. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले, त्यांना दिली जाणारी हीन वागणूक यांमुळे ही डिझायनर्स मुंबईकडे वळू लागली आहेत. विशेषत डिझायनर मुलींना दिल्लीपेक्षा मुंबई कित्येकपटीने सुरक्षित असल्याचे वाटते. इतकेच नव्हे, तर मुंबईकरांकडून मिळणारी आपुलकीची वागणूक दिल्लीत पहायला मिळत नसल्याचे डिझायनर्स सांगतात.
मृणाल भगत, मुंबई

आमच्या घरी आम्हाला आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांसीही सन्मानाने वागण्याची शिकवण दिली जाते. पण जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीत पाय ठेवला, तिथे आपल्या आई-वडिलांशीही अरेरावीत बोलणाऱ्या मुलांना पाहून मी थक्क झालो. तेथील मुलांच्या नजरेत आमच्याबद्दलचे तुच्छ भाव सरळ दिसत असत. पण मुंबईमध्ये मात्र असे चित्र नाही. इथे तुम्ही कुठून आलात यापेक्षा तुमच्या कामाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि ती तुमची खरी ओळख असते. त्यामुळे मुंबई आम्हाला आमच्या घराप्रमाणेच वाटते. त्यामुळे आम्ही इथे कलेक्शन दाखविणे पसंत करतो.
उत्सव प्रधान, डिझायनर