उजनी पाणीयोजनेच्या श्रेयासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत सुरू असलेला कलगीतुरा आता वरिष्ठ नेत्यांमध्येही रंगला आहे. तालुक्याच्या टंचाई आढावा बैठकीत उजनी पाणीपुरवठा योजनेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री मधुकर चव्हाण व राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंग पाटील यांच्यात गुरुवारी चांगलीच खडाजंगी झाली. टंचाई निवारणार्थ आयोजिलेल्या या बैठकीत पाणी कधी येणार, याऐवजी कोणामुळे येणार यावरूनच जुंपली आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेबरोबर विधानसभा व लोकसभेच्या मागील दोन निवडणुका याच मुद्दय़ावरून लढविल्या गेल्या. प्रत्यक्षात उजनीचे पाणी उस्मानाबादपर्यंत अजून पोहोचले नाही. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेच्या निवडणुकीत उजनीचे पाणी तत्काळ आणण्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत, तर उपमुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांत उस्मानाबादला उजनीचे पाणी आणण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात वर्ष उलटून गेले तरी अद्याप उजनीचा थेंबही शहराला मिळाला नाही.
तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत उजनी योजनेवरून खासदार डॉ. पाटील व पालकमंत्र्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पालकमंत्र्यांनी थेट डॉ. पाटील यांना कामाची काय अवस्था आहे, याची किमान माहिती तरी देत जा, मुख्यमंत्र्यांकडून आम्ही निधी मिळविला. मात्र, त्याचे काय सुरू आहे, याची माहिती मिळत नसल्याची खंत बैठकीत उघडपणे व्यक्त केली. त्यावर डॉ. पाटील यांनी आपण पालकमंत्री आहात, आपणास माहिती सहज मिळू शकते. आपणास माहिती दिली जात नाही, हा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, असे सांगताना आपली प्रकृती बरोबर नसते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपणास का सांगायच्या, अशा शब्दांत पाटील यांनी कोपरखळी मारली. अजून १० वर्षे मी भक्कम राहीन, असा टोलाही पालकमंत्र्यांनी लगावला. तरी देखील डॉक्टर म्हणून मला आपली काळजी घ्यावीच लागेल. आपली नस ना नस मला ठाऊक आहे, असे डॉ. पाटील म्हणाले. या शाब्दिक चकमकीमुळे बैठकीत नाहकच तणाव निर्माण झाला.  बैठकीत पालकमंत्री अधिकारी-पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असताना डॉ. पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठक कोणी बोलाविली आहे, बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत, असे म्हणत आपणाला मध्येच प्रश्न विचारायचे असतील, तर मी निघून जाऊ का, असा थेट सवालही पालकमंत्र्यांनी केला.
लोकप्रतिनिधींना भान नाही
टंचाई निवारणार्थ खुद्द पालकमंत्री चव्हाण यांनी बोलविलेल्या बैठकीला तालुक्यातील केवळ २७ पदाधिकारी हजर होते. ११० गावांचे सरपंच, १२ जि.प. सदस्य, २४ पं.स. सदस्यांना बैठकीस हजर राहण्याची सूचना होती. पाण्यासारख्या गंभीर विषयावर बोलविलेल्या बैठकीला केवळ २० गावचे सरपंच, ४ जि.प. सदस्य व ३ पं.स. सदस्यांनीच हजेरी लावली.