डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी काय काम करत? असा प्रश्न यापूर्वी विचारला जात होता. कारण, विद्यापीठ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हते, पण आता विद्यापीठाने जणू काही कात टाकली असून शेतकऱ्यांना विद्यापीठातील संशोधनाचा लाभ व्हावा म्हणून विविध उपक्रम राबविले आहेत. यात आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून घरपोच अहवाल देण्याचा मोठा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
कृषी महाविद्यालयाच्या मृद व कृषी रसायन शाखेच्या अनुभवातून शिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत कृषी समृद्धी रथ सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत हा रथ जाणार आहे. अकोला येथूून २३ जानेवारीला हा रथ निघाला असून या माध्यमातून कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतीतून मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा अहवाल शेतकऱ्यांना घरपोच देतील. अकोला जिल्ह्य़ातील घुसर गावातून मातीचे नमुने घेण्यात येतील. मातीत सोळा सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. मात्र, त्याकडेच दुर्लक्ष होत असल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तथापि, मातीचे परीक्षण केल्यास शेतकऱ्यांना दरवेळी पिकाचे नियोजन करता येईल व चांगले उत्पादनहीे घेता येईल. कृषी विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानवृद्धीसाठी एक चांगला उपक्रम सुरू केला असून यातून त्यांनाही बरेच काही शिकता येणार आहे. कृषी विद्यापीठाचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून या समृद्धी रथाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी.जी. इंगोले यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर हा रथ मार्गस्थ झाला. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मातीचे पृथ:करण व्यवस्थितपणे करावे, असे सांगून यातूनच पुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करता येतील, असे डॉ. इंगोले यांनी सांगितले. याप्रसंगी मृद व रसायन शाखेचे प्रमुख प्रा. एस.डी. देशमुख म्हणाले, आमचा विद्यार्थी विद्यापीठाचा राजदूत असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तो परिश्रम घेईल. प्रास्ताविक डॉ. संदीप हाडोळे यांनी, तर आभार डॉ. जी. एस. लहरिया यांनी मानले.