छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्यासाठी जिवाचा आकांडतांडव करणाऱ्या राजकीय पक्षांना पनवेल येथील शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करण्यात रस नसल्याचे दिसून येते. छत्रपतीच्या पुतळ्यासमोरील चौकातील चबुतरा गेली दोन महिने बाजूला करूनही या चौकाच्या सुशोभीकरणाचा पालिकेला अद्याप मुहूर्त लाभत नसल्याने पनवेलकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या शिवाजी चौकाची आता अक्षरश: दुरवस्था झाली आहे. गेले अनेक महिने या चौकाचे सुशोभीकरण कुणी करायचे यावरून वाद सुरू असून, पालिका प्रशासनाने तोडगा काढूनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या चौकाला बकाल स्वरूप आले आहे.
सकाळ-संध्याकाळ या चौकाच्या चारही बाजूने बसणारे फेरीवाले आणि विविध विक्रेत्यांमुळे हा चौक कोणासाठी, असा प्रश्न पडत आहे. काही वर्षांपूर्वी रोटरी क्लबच्या वतीने बांधण्यात आलेला हा चौक कालांतराने शिवाजी चौक म्हणून ओळखला जात असून त्याची ही ओळख पुसता कामा नये, यासाठी मध्यंतरी युवा सेना व मनसेने विरोध दर्शविला होता. या चौकाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन प्रतीक भोईर मेमोरियल ट्रस्टने या चौकाचे सर्व सुशोभीकरण करण्याची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली होती.
त्यामुळे प्रायोजक या नात्याने या चौकाच्या नामफलकावर भोईर चौक म्हणून नाव लागणार होते. ते काही पक्षांना मान्य नव्हते. त्यामुळे या सुशोभीकरणाला विरोध करण्यात आला. त्या वेळी ही संस्था या चौकाच्या सुशोभीकरणावर ६० लाख रुपये खर्च करण्यास तयार होती.
अखेर या संपूर्ण चौकाला भोईर यांचे नाव न देता केवळ एका वाहतूक बेटाला नाव देण्याचे ठरले आहे. पालिकेने या कामासाठी सुरुवातीला ३७ लाख रुपये खर्च निश्चित केला होता, पण तो आता ५० लाखांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे नगरपालिका आणि संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या या चौकाच्या सुशोभीकरणाचा मुहूर्त कधी लाभणार, अशी विचारणा पनवेलकरांच्या वतीने केली जात आहे.