आयपीएल सामन्यांच्या स्पॉट फिक्सिंग स्कँडलमध्ये नागपूरच्या चौघांची नावे आल्यानंतर त्यांची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून एक पथक सोमवारी चौकशीसाठी नागपुरात येऊन गेले. क्रिकेट बुकी सुनील भाटिया, रणजीपटू मनीष गुड्डेवार, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचा बाबूराव यादव आणि करण ऊर्फ मुन्ना डोले या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या नागपूर कनेक्शनची साखळी जुळविण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी नागपुरातून क्रिकेट सट्टय़ाच्या व्यवसाय चालविणाऱ्या बुकींची यादीच पोलिसांनी तयार केली असून लवकरच अटकसत्र सुरू होण्याची शक्यता असल्याने अनेक बुकी भूमिगत झाले आहेत.
नागपूरच्या कडबी चौकातील रहिवासी असलेला सुनील भाटिया आयपीएल फिक्सिंगच्या निमित्ताने अचानक चर्चेत आला असून त्याचे क्रिकेटपटूंशी संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कधीकाळी ट्रकमधील मालाची आणि नंतर जकात नाक्यावर चोरी करण्याचा व्यवसाय चालविणाऱ्या सुनील भाटियाने अचानक क्रिकेट बेटिंगकडे मोर्चा वळवला. आता तो स्पॉट फिक्सिंगमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याने त्याचे क्रिकेट कनेक्शन शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशीची दिशा निश्चित केली आहे. एकेकाळी अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या सुनील भाटियाने दक्षिण आफ्रिका, दुबई, पाकिस्तान आणि अन्य देशांचाही दौरा केल्याने त्याच्याजवळ अचानक एवढा पैसा कुठून आला, या प्रश्नाने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. या घडामोडी गेल्या चार वर्षांतील आहेत. सट्टा व्यवसायाच्या माध्यमातून त्याने अनेक बडय़ा व्यावसायिकांशी संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याच मदतीने तो क्रिकेटपटूंपर्यत पोहोचला. ओळखीचे रुपांतर नंतर स्पॉट फिक्सिंगपर्यंत झाले. यात रणजीपटू मनीष गुड्डेवारने सक्रिय भूमिका बजावल्याचे उघड झाले आहे. गडचिरोलीचा हा रणजीपटू नागपूरला आल्यानंतर क्रिकेट बेटिंगच्या व्यवसायात आपोआपच ओढला गेला आणि आयपीएल फिक्सिंगमध्ये नाव आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्याचा मोठा भाऊ काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळातील असल्याने काँग्रेस कनेक्शनही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाटिया आणि गुड्डेवार यांच्या माध्यमातून बुकींची एक मोठी साखळीच या व्यवसायात कार्यरत आहे. परंतु, अटकेच्या भीतीने अनेकांनी पलायन केल्याचे समजते.
सट्टा व्यवसायातील महत्त्वाची कडी असलेल्या सुनील भाटियाने बाह्य़ जगतात स्वत:ची साईभक्त व्यावसायिक अशी ओळख निर्माण केली आहे. त्याने साईभक्तांना मदत करण्याच्या नावाखाली अनेक कार्यक्रमांचे, लंगरचे आयोजन केले तसेच शिर्डी साईमंदिरात जाणाऱ्या साईभक्तांसाठी वातानुकूलित बसेस मोफत उपलब्ध करून दिल्याचेही आता उघडकीस आले आहे. मोतीबाग साईमंदिराजवळ त्याने मोठे होर्डिग नेहमीसाठी लावले आहे. त्याचे हैदराबाद आणि औरंगाबादेतील बुकींशी घनिष्ट संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाटियाच्या बेटिंग सेंटरवर पोलिसांनी धाड घालून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक बुकिंच्या मागावर असून त्यापैकी तिघे नागपूरचे असल्याने विदर्भाचे क्रिकेट वर्तुळ हादरले आहे. एकूण पाच मोठे बुकी लवकरच जाळ्यात अडकतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
साईभक्त सुनील भाटियावर खुनाचाही खटला चालविण्यात आला होता परंतु, तो निर्दोष सुटला. त्याच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. भूतकाळातील वाईट परिस्थितीतून त्याने अचानक गर्भश्रीमंतीच्या दिशेने कशी वाटचाल केली याचा इतिहास आश्चर्यजनक आहे. तो अनेक सामान्यांच्या फिक्सिंगमध्ये सहभागी होता. मात्र, पोलीस रेकॉर्डवर सापडला नव्हता. त्यामुळे त्याने व्यवसायाची व्याप्ती वाढविली. तीन वर्षांपूर्वी पाचपावलीतील एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला ठाण्यात बोलावून त्याची कसून चौकशी केली होती. राजनगरात राहणारा करण डोले हा कोराडी मार्गावर हॉटेल चालवत असून त्याचा भागिदारही बेटिंगमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. गोंदियातील रमाकांत ऊर्फ रामा अग्रवाल या बुकीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रामा हा रामदासपेठेतील एका बडय़ा बुकीसाठी काम करीत होता. या बुकीचा देशभरात व्यवसाय असून तो दुबई आणि अन्य देशांनाही नियमित भेटी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या नागपूर कनेक्शनने पोलीस बुचकळ्यात
आयपीएल सामन्यांच्या स्पॉट फिक्सिंग स्कँडलमध्ये नागपूरच्या चौघांची नावे आल्यानंतर त्यांची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून एक पथक सोमवारी चौकशीसाठी नागपुरात येऊन गेले.
First published on: 23-05-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police confused due to nagpur connection with ipl spot fixing