आगामी लोकसभा व त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची प्रशासनाकरवी तयारी सुरू झाली असून नागपूर जिल्ह्य़ातील मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. या मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध झाली असून त्यासाठी २३ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविले जाणार आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात नागपूर व रामटेक हे दोन लोकसभा मतदारसंघ तसेच बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. याआधी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांची संख्या यंदा वाढली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्य़ाची लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार १७१ असून त्यापैकी नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ आहे. लोकसंख्या किंबहुना मतदारांची संख्या वाढली, लोकवस्ती वाढली त्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढली. काटोल विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळेस ३१० मतदान केंद्रे होती. आता सात केंद्रे वाढली आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघात ३३५ केंद्रे होती. यंदा दहा केंद्रे वाढली. हिंगणा विधानसभा मतदारसंघात ३२५ मतदान केंद्रे होती. आता ६८ वाढली आहेत. उमरेड विधानसभा मतदारसंघात ३५८ केंद्रे होती. आता २२ केंद्रे वाढली. कामठी विधानसभा मतदारसंघात ३९७ मतदान केंद्रे होती. यंदा ४८ केंद्रे वाढली. रामटेक विधानसभा मतदारसंघात ३४९ मतदान केंद्रे होती. यंदा ८ केंद्रे वाढली आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३०० मतदान केंद्रे होती. यंदा ५२ केंद्रे वाढली. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात २९४ मतदान केंद्रे होती. यंदा ५८ केंद्रे वाढली. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात २३९ मतदान केंद्रे होती. यंदा ७७ केंद्रे वाढली. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात २८८ मतदान केंद्रे होती. यंदा ४ केंद्रे वाढली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात २९३ केंद्रे होती. यंदा ४६ केंद्रे वाढली. नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ३२० मतदान केंद्रे होती. यंदा ३४ केंद्रे वाढली. ही वाढलेल्या मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत काही तृटी/हरकत/आक्षेप असल्यास २३ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लेखी सादर करता येतील. त्यानंतर फेरबदल होऊन अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.