शनिवारी शहरात आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जागर परिषदेत शिवसंग्राम व छावा या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमधील फ्री-स्टाईलचे औरंगाबादकरांना दर्शन घडले! ‘शिवसंग्राम’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याच्या आरोप करीत अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या परिषदेच्या वेळी अचानक एंट्री घेत परिषद उधळून लावली.
शिवसंग्राम संघटनेने शनिवारी सिडकोतील संत तुकाराम नाटय़गृहात मराठा आरक्षण जागर परिषद आयोजित केली होती. त्यासाठी मेटे हेही शहरात आले होते. तत्पूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकाळी क्रांतिचौकातून मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते संत तुकाराम नाटय़गृहात आयोजित आरक्षण परिषदेसाठी रवाना झाले. छावा युवा संघटनेचे अध्यक्ष सुनील कोटकर, गितेश सोनवणे यांच्यासह काही कार्यकर्ते आधीपासूनच नाटय़गृहात जमले होते. दुपारी एकच्या दरम्यान मेटे व्यासपीठावर आले, त्या वेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी अचानक जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. याच दरम्यान काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरील ध्वनिवर्धक खाली पाडला. या प्रकारामुळे शिवसंग्रामचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनीही आक्रमक होत कोटकर यांच्यासह छावाच्या कार्यकर्त्यांना चोप देण्यास प्रारंभ केला. यात एक कार्यकर्ता व वृत्तपत्र छायाचित्रकार नरेंद्र लोंढे जखमी झाले. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत एकमेकांना भिडलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. जखमींना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोटकर यांना जबर मार लागल्याने घाटीच्या अतिदक्षता विभागात दाखल केल्याची माहिती मिळाली. या प्रकारानंतर पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, सिडको पोलिसांनी या संदर्भात छावाच्या ३-४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आरक्षण मिळेपर्यंत लढणार – मेटे
दरम्यान, या प्रकाराबद्दल आमदार मेटे यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली. मुंबईतील एका बडय़ा नेत्यानेच हा गोंधळ घडवून आणल्याचा आरोपही मेटे यांनी या वेळी बोलताना केला. मराठा, कुणबी समाजाला आता मोलमजुरी करून गुजराण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असून, ते मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. परिषदेत गोंधळ घालणारे सुपारी कार्यकर्ते होते, असा आरोप करतानाच दोन दिवसांपूर्वी मुंबईत काही नेत्यांनी हा गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना सुपारी दिल्याची टीकाही मेटे यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2013 रोजी प्रकाशित
शिवसंग्राम-छावाच्या कार्यकर्त्यांचा राडा!
शनिवारी शहरात आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जागर परिषदेत शिवसंग्राम व छावा या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमधील फ्री-स्टाईलचे औरंगाबादकरांना दर्शन घडले!
First published on: 18-08-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rada shivsangram chava activists in aurangabad