राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात ३६ केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात येत आहे. स्वत:च्या महाविद्यालयासाठी लागणारी वीज स्वत: निर्माण करणारे जिल्ह्य़ातील व पूर्व विदर्भातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
वाढते प्रदूषण व विजेची कमतरता लक्षात घेऊन येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात ३६ केडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. आशुतोष सलिल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. याप्रसंगी ताहीर हसन अली, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय रोषणाईने फुलून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या उद्घाटन समारंभाला प्रतिष्ठीत व्यापारी रमेश मामीडवार, राजू हसन, प्रकल्पाचे संचालक ताहीर हसन अली व प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ. आशुतोष सलिल यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. अध्यक्षीय भाषणात शांताराम पोटदुखे यांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लावण्यात आलेला सौरऊर्जा प्रकल्प जिल्ह्य़ातील एकमेव महाविद्यालय आहे. आज या सौरऊर्जा प्रकल्पाचा सर्वाधिक उपयोग झाला पाहिजे. यादृष्टीने सरकार सुद्धा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित म्हणाले, महाविद्यालयात पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प चांगला आहे, असे म्हणून यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाचे संचालक ताहीर हसन अली यांनी पॉवर प्रेजेंटेशनच्या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्पाचे कार्य व वीज निर्मितीवर त्यांनी मार्गदर्शन करून चंद्रपुरात ५.४ केडब्ल्यू स्क्वेअर मीटर सौरऊर्जा प्राप्त होत असून सौरऊर्जा प्रकल्प हा स्वतंत्र स्त्रोत तयार करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात ऊर्जा प्रकल्प लावण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीवर १८ केडब्ल्यूपी व इलेक्ट्रानिक्स डिपार्टमेंटच्या इमारतीवर १८ केडब्ल्यूपीसह ३६ केडब्ल्यूपी यासह प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज सरळ महाविद्यालयाला जोडण्यात आली आहे. यात सौरऊर्जा प्रकल्पाची वीज व्यर्थ जाणार नाही, असे सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.