‘मला रिजनल सिनेमा करायचा आहे,’ असं सांगून शाहरूखनं मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या चर्चेला पुष्टीच दिली. शाहरूख म्हणाला, ‘प्रादेशिक चित्रपट हा चित्रपटसृष्टीतील खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रादेशिक चित्रपटामध्ये खूप काही चांगलं घडत असतं. मला प्रादेशिक चित्रपट करायला नक्कीच आवडेल. भाषेच्या अडचणीमुळे मी त्यामध्ये अभिनय करू शकणार नाही. मात्र, निर्मिती करायला आवडेल.’ शाहरुखनं माध्यमांच्या प्रतिनिधींशी शुक्रवारी पुण्यात संवाद साधला.
 ‘रोल मॉडेल’बाबत बोलताना शाहरूख म्हणाला, ‘मीच भारतातल्या तरूणाईचं स्वप्न आहे; पण शिक्षण हीच माझी प्रेरणा आहे. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी शिकलं नाही तरी चालतं असा समज ठेऊन तरूण पुढे येत असतात. मात्र, बुद्धिमत्ता आणि त्याच्या जोडीला शिक्षण या दोन्हीची या क्षेत्रासाठी गरज आहे.’’
देशातल्या तरूणाईला हव्याशा वाटणाऱ्या शाहरूखच्या मुलांना मात्र त्यांची आईच जास्त आवडते. ‘माझ्या मुलांना त्यांची आई जास्त आवडते, कारण ती मलाही आवडते. पण शाळेत वडिलांवर निबंध लिहायला सांगितल्यानंतर मुझ्या मुलानं लिहिलं होतं. माझे वडिल खूप मेहनती, प्रामाणिक आहेत. मेहनत घेण्याला पर्याय नाही आणि त्याबाबत माझी मुलं मला आदर्श मानतात. मात्र, यश मिळावं, प्रसिद्धी मिळावी म्हणून काम करणं योग्य नाही. उच्चांक मोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं, की तुम्हीच तुम्हाला एक बंधन घालता, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे उच्चांक मोडण्यापेक्षा आनंदासाठी काम करायला आवडतं.’’
अजून कोणती गोष्ट करावीशी वाटते, याबाबत बोलताना शाहरूख म्हणाला ‘मी अभिनेता आहे आणि पहिल्यापासून मी अभिनयच करत आलोय. अगदी रामलीला, नाटक, सिरीयल्स, चित्रपट असं सगळ्या माध्यमांमध्ये अभिनय केलाय. त्यामुळे अभिनय हेच माझं क्षेत्र आहे. पण त्यापेक्षा वेगळं म्हणजे मला लोकांना कलेचा आनंद घेता येईल, असं काहीतरी उभं करायचं आहे. प्रेक्षक खर्च करून काहीतरी पाहतात, तेव्हा त्याच्या पुरेपूर आनंद त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटतं.’ फिटनेसबद्दल बोलताना शाहरूख म्हणाला, ‘मी खूप व्यायाम करत नाही, आवडेल ते खातो आणि गरजेपेक्षा जास्त नाही. किंबहुना चित्रपट क्षेत्रामध्ये मला माहीत असलेल्या अभिनेत्रीही खूप वेळ व्यायाम, डाएट असं काही करत नाहीत. मात्र, यामध्ये नियमितता हवी.
‘चेन्नई एक्सप्रेस’बद्दल बोलताना तो म्हणाला, ‘चेन्नई एक्सप्रेस हा सगळ्या कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आहे. निखळ विनोदी प्रेमकथा आहे. त्याला प्रेक्षकांचाही प्रतिसाद उत्तम मिळतो आहे.’’

पुरूषप्रधान संस्कृती ही फक्त चित्रपटसृष्टीमध्ये नाही, तर आपल्या समाजातच आहे. मात्र, ती बदलायला हवी. अभिनेत्रीचं नाव आधी देण्याची कल्पना टाटा टी च्या जाहिरातीतून पुढे आली आणि मला ती आवडली. माझ्या या पुढील चित्रपटांमध्येही अभिनेत्रीचंच नाव आधी असेल. मी बाकीच्या निर्मात्यांनाही याबाबत सांगणार आहे.

शाहरूख बोले
आवडलेली भूमिका – ‘या पुढची !’
अजून किती काळ चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल – ‘मरते दम तक! मी अजून फक्त ४७ वर्षांचाच आहे.’
यशाची व्याख्या काय – ‘मला बघून लोकांच्या चेहऱ्यावर छान हसू येणे!’