कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांवर नवे उमेदवार विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे शिवसेनेला कशीबशी सत्ता टिकविता आली. त्यामुळे कल्याणमध्ये मनसेची शिवसेनेला एकप्रकारे साथ असल्याचे चित्र यापूर्वीही दिसून आले आहे. असे असताना विरोधी पक्षनेतेसाठी नव्या दमाच्या उमेदवाराच्या शोधात मनसेचे नेते असले तरी महापालिकेत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचे काम नवा नेते प्रभावीपणे करू शकेल का, असा सवाल सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात स्वत:चे अस्तित्व दाखविण्याचे वेगवेगळे प्रयत्न मनसेने सुरू केले आहेत. असे असले तरी महापालिकेच्या कामकाजात गेल्या काही वर्षांत या पक्षाच्या नगरसेवकांना फारशी चमक दाखविता आलेली नाही. गेल्या अडीच वर्षांत महापालिकेत तटस्थपणाच्या भूमिकेत वावरणाऱ्या मनसेच्या २७ नगरसेवकांमुळे शिवसेना, भाजपला सत्ता टिकवता आली आहे. विरोधी पक्षात राहून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची भाषा राज ठाकरे करत असले तरी गेल्या अडीच वर्षांत मनसेने आक्रमकपणे शिवसेना-भाजपला जेरीस आणले आहे, असे चित्र अपवादानेच दिसले. तरीही निवडणुकांच्या तोंडावर नव्या दमाचा विरोधी पक्षनेता बसवून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न आता मनसेने सुरू केला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मंदार हळबे यांनी गेल्या वर्षभरात आपली चमक दाखवली असली तरी आणखी प्रभावी कामगिरी करण्याची त्यांना संधी होती.
दरम्यान, महापौर, उपमहापौरपदी शिवसेना, भाजपचे नवे उमेदवार विजयी होताच मनसेने विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुदेश चुडनाईक, हर्षद पाटील, मनोज घरत, राजन मराठे यांची नावे चर्चेत आणली आहेत. चुडनाईक हे दहा वर्षे नगरसेवक आहेत. चुडनाईक यांना एकदाही मानाचे पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या वेळी चुडनाईक यांची विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी त्यांच्या समर्थकांनी जोरदार मागणी पक्ष नेत्यांकडे केली आहे. पाटील, घरत, मराठे हे नव्या फळीतील दमदार उमेदवार असल्याने त्यांना पुढील काळात संधी देण्यात यावी, असा सूर पक्षातील एका गटातून व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
कल्याण-डोंबिवली पालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी मनसेत चुरस
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौर, उपमहापौर या दोन्ही पदांवर नवे उमेदवार विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
First published on: 28-05-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rivalry in mns for kalyan dombivli corporations opposition leadership