विधानसभा निवडणूक आणि नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांचे अटकसत्र सुरू केले असताना सोमवारी मध्यरात्री एका टोळक्याने शिंदे गावालगतच्या पेट्रोल पंपाबाहेर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मारहाण करत हवेत गोळीबार केला. धुमाकूळ घालणाऱ्या टोळक्याने संबंधितांची लूटमार केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिन्नर तालुक्यातील सोनांबेचे रहिवासी ज्ञानेश्वर पवार सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपले बंधू व गावातील शेतकरी सुदाम पवार, दत्तात्रय पवार, सुदाम शिंदे यांच्यासोबत टोमॅटो विक्रीसाठी टेम्पोद्वारे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. टोमॅटो विक्री झाल्यावर रोख पैसे न घेता पवार यांनी पावत्या घेतल्या. ज्ञानेश्वर यांनी विक्री व्यवहाराची आगाऊ रक्कम म्हणून पाच हजार रुपये घेतले. व्यवहार आटोपल्यानंतर ही मंडळी रात्री उशिराने सिन्नरकडे मार्गस्थ झाली. रात्री एकच्या सुमारास शिंदे येथे पोहोचले असता टेम्पोत डिझेल भरण्यासाठी सुभाष पेट्रोल पंपाकडे त्यांनी गाडी वळविली. त्याच वेळी वळणावर इंडिका कारमधील दोन व्यक्तींनी बाहेर उतरून पवार यांच्याशी धक्का का मारतो असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. या वेळी पवार यांच्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. इंडिकातून आणखी दोन जण खाली उतरले आणि बेदम मारहाण करू लागले. टेम्पोतील अन्य लोकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता टोळक्यातील एकाने पवार यांच्या कानावर पिस्तूल लावली. या वेळी हवेत गोळी झाडण्यात आली. बंदुकीचा धाक दाखवत पवार यांच्याकडील व्यवहाराचे पाच हजार, पाकिटातील दीड हजार आणि भ्रमणध्वनी असा ऐवज हिसकावून घेतला. या घटनेमुळे रस्त्यावरील इतर वाहनधारक थांबत असल्याचे लक्षात आल्यावर टोळक्याने पुन्हा हवेत गोळीबार करत आपल्या कारने नाशिकच्या दिशेने पलायन केले. या प्रकरणी शेतकऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता गाडी सातपूर येथील राकेश सोनार यांची असल्याचे लक्षात आले. मात्र, या घटनेनंतर सोनार फरार असून त्यांच्यासह अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
हवेत गोळीबार करून लूटमार
विधानसभा निवडणूक आणि नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांचे अटकसत्र सुरू केले असताना सोमवारी मध्यरात्री एका टोळक्याने शिंदे गावालगतच्या पेट्रोल पंपाबाहेर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मारहाण करत हवेत गोळीबार केला.
First published on: 01-10-2014 at 08:58 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery case in nashik