बँकेतून काढलेली १४ लाखांची रोकड चोरटय़ांनी लासलगाव – कोटमगाव रस्त्यावरील गाडीतून दिवसाढवळ्या लंपास केल्याच्या घटनेमुळे लासलगाव ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली. परंतु, कोणी हाती लागू शकले नाहीत. महामार्गावरून कोटय़वधींचे सोने लंपास करणे, येवला तालुक्यात ५० लाखाची रोकड लंपास करणे या घटनाक्रमानंतर ग्रामीण भागात अलीकडच्या काळात घडलेली ही तिसरी लुटीची घटना आहे.
मालेगावच्या उमराणे येथील कांदा व्यापारी शिवाजी देवरे हे नेहमी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लासलगाव शाखेतून कांदा खरेदी-विक्रीची रक्कम काढून उत्पादकांना देत असतात. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास लासलगाव एसबीआयमधून १४ लाख रुपये काढून त्यांनी आपल्या टाटा मांझा मोटारीत ठेवले होते. त्यानंतर चालक समाधान खैरनार याच्यासह ते कोटमगाव रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या समोर आले. मोटारीत १४ लाखाची रोकड तशीच ठेवून या बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी चालक खैरनार हा लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यानंतर ते परत आले असता मागची काच फोडून मोटारीतील रोकड असणारी कापडी पिशवी कोणीतरी लंपास केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने लासलगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधला.
कोटमगाव हा तसा वर्दळीचा परिसर असून त्या ठिकाणी भर दुपारी लूट झाल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर नाकेबंदीचे निर्देश दिले. चालकाची चौकशी करण्यात आली. कोणीतरी पाळत ठेवून ही धाडसी लूट केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, मागील काही दिवसात ग्रामीण भागात या स्वरूपाच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. शिरपूर येथे प्रक्रिया करण्यासाठी मुंबईहून निघालेले १७ कोटींचे सोने पहाटेच्या सुमारास महामार्गावर गाडी थांबवत लंपास करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी जिल्हा बँकेची ५० लाख रुपयांची रोकड येवला तालुक्यात चोरटय़ांनी लुटली होती. डोळ्यात तिखट फेकत आणि मारहाण करत ही रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणाचा छडा काही दिवसांपूर्वी लागला. त्यानंतर पुन्हा रोकड लुटीची ही घटना घडली.
लासलगाव व आसपासच्या परिसरात कृषीमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2015 रोजी प्रकाशित
लासलगावमधून भरदिवसा १४ लाखांची रोकड लंपास
बँकेतून काढलेली १४ लाखांची रोकड चोरटय़ांनी लासलगाव - कोटमगाव रस्त्यावरील गाडीतून दिवसाढवळ्या लंपास केल्याच्या घटनेमुळे लासलगाव ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

First published on: 10-06-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in nashik