दिवसेंदिवस पालिकेतील मनसेची तोफ थंडावत चालल्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी फेरबदल करीत आपल्या नगरसेवकांना झटका दिला. अनेक प्रश्नांवर बोटचेपे धोरण घेणाऱ्या दिलीप लांडे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करीत या पदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केली.
डॉकयार्ड येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी पालिका सभागृहात चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी आपले भाषण उरकल्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास सभागृहातून काढता पाय घेतला. अतिरिक्त आयुक्तांच्या बेजबाबदार उत्तरावर तोफ डागताना मनसेची तोफ लुळीपांगळी झाली. गेल्या काही महिन्यांमध्ये स्थायी समितीच्या बैठकांमध्येही मनसेचा ‘आवाज’ बंद झाला होता.
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तूंची खरेदी चढय़ा दराने करण्यात येत असल्याप्रकरणी आवाज उठविणारे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मनसेचा पालिकेत दबदबा निर्माण केला होता. अनेक प्रश्नांवर आवाज उठवत ते स्थायी समिती गाजवतही होते. मात्र गेल्या वर्षी स्थायी समितीचे सदस्यत्व त्यांना गमवावे लागले होते. त्यानंतर स्थायी समितीमध्ये मनसेचा आवाज कधी बुलंद झालाच नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरे यांनी लांडे यांची उचलबांगडी करीत देशपांडे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली.