जिल्ह्य़ातील अल्पसंख्याकांसाठी असलेल्या घरकुल योजना, मुलींचे वसतिगृह, अंगणवाडीची बांधकामे मुदतीत पूर्ण होण्याच्या स्थितीत नाहीत. या बरोबरच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, गणवेश वाटप या बाबत यंत्रणेकडे आवश्यक माहिती नाही. याचा अर्थ या बाबत यंत्रणा उदासीन असून प्रशासनाने गांभीर्याने अल्पसंख्याकांच्या योजनांकडे लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दांत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
जिल्ह्य़ातील अल्पसंख्याक विकास योजनांबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
१५ कलमी कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीत ० ते ६ वयोगटातील अल्पसंख्य लाभार्थीची संख्या अल्प आहे. विविध योजना, राहिलेली अपूर्ण कामे व अल्पसंख्य घटकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याबाबत हकीम यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जि. प. सदस्य मुनीर पटेल, नगरपालिकेचे उपाध्यक्ष शेख निहाल आदी उपस्थित होते.